मुंबई, (प्रतिनिधी) १८ जून - मुंबईतील वडाळा परिसरात पेट्रोल, डिझेल आणि थेट विमानाचे इंधन (ATF - Aviation Turbine Fuel) चोरणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दक्षता पथकाने पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत तब्बल १ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता पथकाने १६ जून २०२६ रोजी वडाळा परिसरात हा गुप्त छापा टाकला. इंधन वाहून नेणाऱ्या टँकरमधून इंधनाची चोरी करून ते काळ्या बाजारात विकले जात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.
सील तोडून पाईपने काढत होते विमानाचे इंधन!
दक्षता पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा दोन मोठ्या इंधन टँकरचे सील तोडून, त्यातून प्लास्टिक पाईप आणि व्हॉल्वच्या साहाय्याने २० लीटरच्या प्लास्टिक कॅनमध्ये इंधन भरण्याचे काम सुरू होते. पथकाने तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला इंधन चोरी करताना रंगेहाथ पकडले.
तपासणीत जप्त केलेल्या टँकरमधील इंधनाचा साठा:
टँकर क्र. MH-04 KU-1826 : १० हजार लीटर पेट्रोल आणि १४ हजार लीटर डिझेल.
टँकर क्र. MH-04 LY-6388 : २९ हजार लीटर विमान इंधन (ATF).
पथकाने या दोन्ही टँकर्समधील लाखो रुपयांच्या इंधनासह, दोन्ही टँकर आणि चोरीसाठी वापरले जाणारे इतर साहित्य असा एकूण १ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या अधिकाऱ्यांच्या पथकाने केली कारवाई
ही यशस्वी कामगिरी दक्षता पथकातील उपनियंत्रक शिधावाटप गणेश बेल्लाळे, उपनियंत्रक माधुरी शिंदे, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे, शिधावाटप अधिकारी गणेश पवार, सहायक शिधावाटप अधिकारी योगेश्वर मोरे तसेच शिधावाटप निरीक्षक रामराजे भोसले, चंद्रकांत कांबळे, विकास नागदिवे, राहुल इंगळे आणि अरुण काते यांनी बजावली.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध आणि या रॅकेटच्या सुत्रधारांविरोधात वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या इंधन चोरीच्या मागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा पुढील तपास विभागाकडून केला जात आहे.