मुंबई, (प्रतिनिधी) १८ जून - राज्यातील अंगणवाडीतील ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता तसेच आकांक्षित जिल्ह्यांतील किशोरवयीन मुलींना देण्यात येणाऱ्या घरपोच आहारामध्ये (THR) राज्य सरकारने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या आहारात पोषणमूल्यांसोबतच चवीलाही प्राधान्य देण्यात आले असून, आता 'व्हेज पुलाव' आणि 'मल्टीग्रेन पफ' या दोन नवीन व रुचकर पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्रालयात आयोजित एका विशेष आढावा बैठकीत मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः या पोषण आहाराच्या गुणवत्तेची तपासणी केली. या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त माधवी सरदेशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पोषण आहारात काय बदल झाले?
केंद्र शासनाच्या निकषानुसार सध्या हा आहार 'प्रीमिक्स' (तयार मिश्रण) स्वरूपात दिला जातो. लाभार्थ्यांचा प्रतिसाद आणि तज्ज्ञांच्या शिफारशींनुसार त्यात पुढील सुधारणा करण्यात आल्या आहेत:
स्वतंत्र मसाल्याचे पाकीट : सध्याच्या ‘एनर्जी डेन्स मूग डाळ खिचडी प्रीमिक्स’चा दर्जा अधिक चांगला राखण्यासाठी आता मसाल्याचे पाकीट स्वतंत्रपणे दिले जाईल, जेणेकरून चव अधिक रुचकर लागेल.
दोन नव्या पाककृती : आहारात वैविध्य आणण्यासाठी 'व्हेज पुलाव' आणि 'मल्टीग्रेन पफ'चा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
जुनी पाककृती कायम : आधीपासून सुरू असलेली ‘मल्टी मिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स’ ही पौष्टिक पाककृती पुढेही कायम ठेवण्यात आली आहे.
"सर्व पाककृतींमध्ये केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या प्रमाणात उष्मांक (कॅलरीज), प्रथिने (प्रोटीन्स) आणि आवश्यक सूक्ष्म पोषकतत्त्वांचा (मायक्रोन्यूट्रिएंट्स) समावेश आहे."
– आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री.
राज्यभरात सर्वेक्षण करूनच निर्णय
या बदलांविषयी माहिती देताना विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी सांगितले की, आहारामध्ये हे बदल करण्यापूर्वी राज्यभर विस्तृत सर्वेक्षण करण्यात आले होते. तसेच वैद्यकीय अधिकारी, आहारतज्ज्ञ आणि तज्ज्ञ संस्थांची मते जाणून घेण्यात आली. या नवीन पाककृतींमुळे लाभार्थ्यांची आहाराबाबतची आवड आणि स्वीकृती नक्कीच वाढेल, असा विश्वास क्षेत्रीय यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
कुपोषणमुक्तीच्या मोहिमेला मिळणार बळ
राज्यातील कुपोषण कमी करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असून, मागील तीन वर्षांत कुपोषणाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. नव्या आणि चवदार पाककृतींमुळे बालके आणि माता हा आहार आवडीने घेतील, ज्यामुळे कुपोषण निर्मूलनाच्या मोहिमेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास मंत्री तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.