पुणे, (प्रतिनिधी) १८ जून - "प्रस्तावित मुंबई-पुणे बुलेट ट्रेनमुळे दोन्ही शहरांतील प्रवासाचा वेळ अवघ्या ४८ मिनिटांवर येणार असून, यामुळे मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरे मिळून एक भव्य 'एकात्मिक आर्थिक क्षेत्र' म्हणून विकसित होतील. तसेच जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना समृद्धी महामार्गालगत स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरद्वारे जोडून महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे (Global Supply Chain) एक महत्त्वाचे केंद्र बनविण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील 'जबिल' (Jabil) कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन विस्तार प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी केंद्रीय रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव, आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी व कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते.
लॉजिस्टिक खर्च ७ ते ८ टक्क्यांनी कमी होणार!
मुख्यमंत्र्यांनी जेएनपीटी आणि अंतिम टप्प्यात असलेल्या 'वाढवण' बंदराला समृद्धी महामार्गालगत स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरद्वारे जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासमोर मांडला.
हा कॉरिडॉर जालना, वर्धा येथील ड्राय पोर्ट आणि पुढे गडचिरोलीपर्यंत जोडला जाईल.
या प्रकल्पामुळे उद्योगांचा लॉजिस्टिक्स (वाहतूक) खर्च ७ ते ८ टक्क्यांपर्यंत कमी होईल.
देशाच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) महाराष्ट्राचा वाटा १४ टक्के असून, देशाच्या एकूण निर्यातीत राज्य तब्बल २० टक्के योगदान देते, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
डेटा सेंटर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात महाराष्ट्र अग्रस्थानी
महाराष्ट्र हा देशातील 'डेटा सेंटर हब' म्हणून वेगाने उदयास येत असून, भारतातील सुमारे ६० टक्के डेटा सेंटर क्षमता एकट्या महाराष्ट्रात विकसित होत आहे. इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत राज्याने देशात अग्रस्थान मिळवले असून, केंद्र सरकारने दिलेल्या 'इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर'मुळे या क्षेत्राला नवी गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या महत्त्वपूर्ण घोषणा:
पुणे-हैदराबाद प्रवास २ तासांत: देशातील पायाभूत परिवर्तनामुळे मुंबई-पुणे बुलेट ट्रेन प्रवास ४८ मिनिटांत, तर पुणे-हैदराबाद प्रवास अवघ्या २ तास ८ मिनिटांत पूर्ण होईल.
देशात ४ सेमीकंडक्टर प्रकल्प: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योग १३ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून, देशात आता चार मोठे सेमीकंडक्टर प्रकल्प कार्यान्वित होत आहेत.
तिसरी सर्वात मोठी निर्यात: इलेक्ट्रॉनिक्स ही आता भारताची तिसरी सर्वात मोठी निर्यात श्रेणी बनली आहे.
औद्योगिक पट्ट्यात कायदा-सुव्यवस्था कडक करणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
रांजणगाव औद्योगिक परिसरातील वीज पुरवठ्यासाठी 'महावितरण'चे स्वतंत्र विभागीय कार्यालय स्थापन करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच, उद्योगांच्या सुरक्षेसाठी या औद्योगिक पट्ट्यात पोलीस यंत्रणा अधिक बळकट केली जाईल. उद्योगांना त्रास देणारा "कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही," असा कडक इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुंडगिरी करणाऱ्या घटकांना दिला.
'जबिल' कंपनीचा विस्तार: गेल्या एका वर्षात जॅबिल कंपनीचे भारतातील उत्पादन क्षेत्रफळ ५ लाख चौरस फुटांवरून १२ लाख चौरस फुटांपर्यंत वाढले असून, कर्मचाऱ्यांची संख्या ५ हजारांवरून थेट ११ हजारांवर पोहोचली आहे.