नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १८ जून - शिवसेनेतील (ठाकरे गट) ६ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी पत्र दिल्याचा दावा केला जात असतानाच, दुसरीकडे या राजकीय घडामोडींवरून दिल्लीत कमालीचा थरार रंगला आहे. हे ६ खासदार आपल्यासोबत नसल्याचा ठाम विश्वास ठाकरे गटाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे लोकसभेतील गटनेते खासदार अरविंद सावंत यांनी 'व्हीप' (Whip) जारी करून आज, १८ जून रोजी सकाळी ११ वाजता नवी दिल्लीत संसदीय पक्षाची तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक म्हणजेच खासदारांच्या एकनिष्ठतेची 'लिटमस टेस्ट' ठरणार आहे. दुसरीकडे, खासदार अरविंद सावंत यांनी 'ऑपरेशन टायगर'वर भाष्य करताना आपल्या खासदारांवर पूर्ण विश्वास असल्याचे म्हटले आहे. तसेच, "जर ऑपरेशन टायगर खरोखरच यशस्वी झाले असेल, तर फुटीर खासदारांचे चेहरे समोर आणून दाखवा," असे थेट आव्हान त्यांनी शिंदे गटाला दिले आहे.
६ पैकी २ खासदारांनी स्वाक्षरी केलीच नाही?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या ६ खासदारांपैकी २ खासदारांची दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी पत्रावर स्वाक्षरीच केली नसल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. त्यामुळे हे दोन खासदार आजच्या बैठकीला निश्चितपणे उपस्थित राहतील, असा विश्वास पक्षाला आहे. मात्र, ठाकरे गटाकडेही सध्या त्यांचे सर्वच्या सर्व खासदार सोबत असल्याची अधिकृत माहिती नाही.
तसेच, शिंदे गटाकडूनही लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्राबाबत किंवा खासदारांच्या स्वाक्षऱ्यांबाबत कोणताही अधिकृत फोटो किंवा माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे "आपल्या कोणत्याही खासदाराविरोधात आत्ताच कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका," अशा सूचना मातोश्रीवरून नेत्यांना देण्यात आल्या आहेत.
'ऑपरेशन टायगर'ची खळबळजनक टाईमलाईन (१० ते १७ जून):
१० जून : एनडीए (NDA) च्या बैठकीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 'ऑपरेशन टायगर'बाबत चर्चा झाली. शाहांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा करून संमती मिळवली. त्याच रात्री शाह, फडणवीस आणि शिंदे यांच्या बैठकीनंतर मोहिमेला 'ग्रीन सिग्नल' मिळाला. दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेंच्या खासदारांची शिंदेंसोबत गुप्त भेट झाल्याची चर्चा.
१४ जून : उद्धव ठाकरेंनी 'मातोश्री'वर बोलावलेल्या बैठकीला ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय जाधव हे तीन खासदार गैरहजर राहिल्याने संशय बळावला.
१५ जून : खासदार संजय देशमुख यांनी दिल्लीत शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांची भेट घेतली.
१६ जून : ठाकरांचे ६ खासदार दिल्लीत दाखल झाल्याच्या बातम्या आल्यानंतर एकनाथ शिंदेही दिल्लीला रवाना झाले. दरम्यान, अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून "फुटीर गटाला मान्यता देऊ नका," अशी विनंती केली.
१७ जून : संजय राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांची पत्रकार परिषद झाली. तर दुसरीकडे, ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याचे पत्र अध्यक्षांना दिल्याचे वृत्त आले. ठाकरे गटाकडून १८ जूनच्या बैठकीसाठी सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला.
नेत्यांकडून खासदारांची मनधरणी सुरू
फुटण्याची शक्यता असलेल्या आणि संशयाच्या घेऱ्यात असलेल्या खासदारांशी संपर्क साधण्यासाठी ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांची धावपळ सुरू आहे. मराठवाड्यातील खासदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्यावर सोपवण्यात आली असून, मंगळवारी रात्रीपर्यंत त्यांचा संपर्क झाला होता. दुसरीकडे, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांच्याशी आमदार सचिन अहिर आणि माजी आमदार रमेश कोरगावकर हे वारंवार संपर्क साधून मनधरणी करत आहेत. हे सर्व नेते थेट उद्धव ठाकरे यांना तासातासाचा अहवाल देत आहेत.
आज सकाळी ११ वाजता होणाऱ्या बैठकीत नेमके किती आणि कोणते खासदार हजर राहतात, यावरच आता 'ऑपरेशन टायगर'चे भवितव्य आणि ठाकरे गटाची पुढील रणनीती अवलंबून असणार आहे.