मुंबई, (प्रतिनिधी) १७ जून - केंद्र पुरस्कृत 'प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना' (PM-AJAY) अंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे. या योजनेसाठी निवडण्यात आलेल्या राज्यातील २८ जिल्ह्यांमधील ७४१ गावांमध्ये आगामी २३ जून ते २५ जून २०२६ या कालावधीत विशेष ग्रामसभा आणि संयुक्त पडताळणी मोहीम राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात येत असलेल्या या मोहिमेचे संपूर्ण नियोजन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
७० पेक्षा जास्त गुण मिळवणारी गावे होणार 'आदर्श ग्राम'
या विशेष तीन दिवसीय मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेबाबत व्यापक जनजागृती करणे आणि गावांच्या नेमक्या विकासात्मक गरजा ओळखून 'ग्राम विकास आराखडे' (VDPs) तयार करणे हे आहे.
या आराखड्यांना ग्रामसभेची मंजुरी मिळवून दिली जाईल.
ज्या गावांचे ग्राम विकास आराखडे आधीच तयार आहेत, त्यांना जिल्हास्तरीय समितीकडून अंतिम मान्यता दिली जाईल.
विशेष निकष: या मोहिमेत ५० सामाजिक-आर्थिक निर्देशक आणि १५ ग्रामीण पायाभूत सुविधा निकषांच्या पूर्ततेबाबत ग्रामसभांमध्ये सविस्तर सल्लामसलत केली जाईल. या मूल्यमापनात ज्या गावांचे गुणांकन ७० किंवा त्यापेक्षा अधिक असेल, त्या गावांना अधिकृतपणे ‘आदर्श ग्राम’ म्हणून घोषित करण्यात येईल.
विकासासाठी १० लाखांच्या निधीची तरतूद आणि डिजिटल नोंदणी
आदर्श ग्राम म्हणून घोषित झालेल्या गावांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रभावी समन्वय साधण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. याशिवाय, गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या कामांच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांपर्यंतच्या निधीची मागणी प्रस्तावित करण्याची कार्यवाही या मोहिमेदरम्यान केली जाईल.
केंद्राच्या सूचनेनुसार, निवडलेल्या सर्व गावांची संयुक्त पडताळणी (Joint VDP Inspection) केली जाणार असून, त्याचा संपूर्ण रिअल-टाइम तपशील ‘PM-AJAY’ या अधिकृत मोबाईल अॅप्लिकेशनवरील 'Village Inspection Report' मध्ये ऑनलाइन नोंदविण्यात येणार आहे, ज्यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता राहील.
मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा!
"ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. या विशेष ग्रामसभा मोहिमेत गावातील सर्व ग्रामस्थ, अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि महिला बचत गटांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही मोहीम यशस्वी करावी."
- दिपा मुधोळ-मुंडे, समाज कल्याण आयुक्त
ग्रामीण विकासाला मिळणार नवा आयाम
या मोहिमेमुळे राज्यातील शेकडो गावांना पायाभूत सुविधा मिळण्यासोबतच तेथील सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे. प्रशासनाने या मोहिमेसाठी कंबर कसली असून, २३ जूनपासून राज्यातील २८ जिल्ह्यांमध्ये ग्रामविकासाचा हा विशेष उत्सव सुरू होणार आहे.