नाशिक, (प्रतिनिधी) १७ जून - पुणे येथील भीषण दारूकांडानंतर राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभाग संपूर्ण राज्यात खडबडून जागा झाला आहे. पुण्यातील विषारी गावठी दारूमुळे अनेकांचा बळी गेल्यानंतर, नाशिक उत्पादन शुल्क विभागाने इतर सर्व कामांना बाजूला ठेवून 'मिशन गावठी दारू' ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत गावठी दारूचे उगमस्थान असलेल्या आदिवासी भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, भरारी पथक क्रमांक १ ने गेल्या वीस दिवसांत त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यांतील दुर्गम गावपाड्यांमध्ये, नदी-नाले आणि डोंगर-दऱ्या तुडवत अनेक बेकायदेशीर हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. विभागीय उपायुक्त उषा वर्मा व अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये दारूच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी दोन वाहने आणि दारू निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल असा एकूण ३५ लाख ५३ हजार २१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२८ गुन्हे दाखल, २१ आरोपींना ठोकल्या बेड्या
भरारी पथक क्रमांक १ ने गेल्या २८ मे ते १६ जून २०२६ दरम्यान बोरीचीवाडी, इंदोरे, कॉलनीची वाडी, खैरगाव तसेच मुळेगाव परिसरातील हातभट्ट्यांवर थेट कुऱ्हाड चालवली. या २0 दिवसांच्या कारवाईत एकूण २८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये ६ गुन्हे गावठी दारू विक्रीचे, तर ४ गुन्हे बेकायदेशीर ताडी विक्रीचे आहेत. याप्रकरणी पथकाने २१ जणांना बेड्या ठोकल्या असून, ८ बेवारस भट्ट्यांच्या मालकांचा शोध सध्या सुरू आहे.
कारवाईचा सविस्तर ताळेबंद (मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त):
या धडक मोहिमेदरम्यान खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त आणि नष्ट करण्यात आला आहे:
अ.क्र.जप्त / नष्ट केलेले साहित्यएकूण प्रमाण
१काळा गूळ (दारू निर्मितीचा कच्चा माल)अडीच टन (२,५०० किलो)
२नष्ट केलेले कच्चे रसायन४९ हजार ७४० बल्क लिटर
३जप्त केलेली गावठी दारू८३५ बल्क लिटर
४जप्त केलेली बेकायदेशीर ताडी३३० लिटर
५कारवाईत जप्त केलेली वाहने२ वाहने
६एकूण जप्त मुद्देमालाची किंमत३५ लाख ५३ हजार २१० रुपये
कारवाई यापुढेही सुरूच राहणार: विलास बामणे
गावठी दारूची निर्मिती, तिची वाहतूक आणि विक्री यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी हे 'मिशन' यापुढेही अधिक तीव्रतेने सुरूच राहणार असल्याचा इशारा भरारी पथक क्र. १ चे निरीक्षक विलास बामणे यांनी दिला आहे.
ही यशस्वी आणि धाडसी कारवाई दुय्यम निरीक्षक संजय सावंत, गणेश नागरगोजे तसेच जवान दीपक आव्हाड, संदीप देशमुख, सागर पवार, विजेंद्र चव्हाण, प्रकाश गायकवाड, मुस्तफा तडवी आणि अनिता भांड यांच्या पथकाने जीवाची पर्वा न करता दुर्गम भागात जाऊन पूर्ण केली. एक्साईजच्या या आक्रमक पवित्र्यामुळे नाशिक जिल्ह्यातील दारू माफियांचे धाबे दणाणले आहेत.