नाशिक, (प्रतिनिधी) १७ जून - महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाचे संकेत मिळत असताना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे काही खासदार फुटणार असल्याच्या वावड्या उठत असताना, नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी मात्र निष्ठेचा गड राखला आहे. सत्ताधारी गटाकडून तब्बल १०० कोटी रुपये आणि कर्जमुक्तीची मोठी ऑफर देऊनही राजाभाऊंनी ती साफ नाकारल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. "राजकारण सोडेन, पण ठाकरेंची साथ सोडणार नाही," अशी रोखठोक भूमिका घेत वाजे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी आपली निष्ठा कायम ठेवली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे नाशिककरांसह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
'आम्हाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नाही!' – वाजे कुटुंबाची स्वाभिमानी प्रतिक्रिया
खासदार राजाभाऊ वाजे यांच्या या ऐतिहासिक आणि कणखर निर्णयावर त्यांचे वडील प्रकाश वाजे यांनी अत्यंत भावूक आणि स्वाभिमानी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या पुत्राच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत ते म्हणाले, "आमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, आम्हाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नाही. आम्हालाही मोठी प्रलोभने आणि ऑफर्स आल्या होत्या, मात्र आम्ही त्या अत्यंत स्वाभिमानाने नाकारल्या. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी आणि उद्धवजींशी कायम निष्ठावंत राहू." वडिलांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे वाजे कुटुंबाच्या राजकीय खानदानीपणाची चर्चा आता राज्यभर रंगू लागली आहे.
विकासात नाही, तर इतिहासात नोंद!
राज्यात सध्या सुरू असलेल्या खुनशी आणि पैशांच्या बळावर होणाऱ्या राजकारणाला छेद देत राजाभाऊंनी घेतलेल्या भूमिकेचे पडसाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उमटत आहेत. "खुनशी राजकारणामुळे राजाभाऊ वाजे यांची कदाचित सत्तेच्या विकासात नोंद होणार नाही, पण महाराष्ट्राच्या स्वाभिमानी इतिहासात त्यांची 'निष्ठावान' म्हणून नोंद सुवर्णअक्षरांनी होईल," अशा आशयाच्या पोस्ट नेटकऱ्यांकडून शेअर केल्या जात आहेत. 'खानदानी लोकच शब्दाला पक्के असतात' असे म्हणत नाशिककरांनी आपल्या या 'निष्कलंक' खासदाराचा अभिमान व्यक्त केला आहे.
दिल्लीतील पत्रकार परिषदेत डोळे पाणावले
दरम्यान, पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीत पोहोचलेले खासदार राजाभाऊ वाजे हे अत्यंत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत राजाभाऊंच्या निष्ठेचे विशेष कौतुक केले. "खासदारक्या येतील आणि जातील, पण संकटाच्या काळात पक्षासोबत उभे राहणे यालाच खरी श्रद्धा म्हणतात," अशा शब्दांत राऊत यांनी वाजेंचा गौरव केला, तेव्हा राजाभाऊंच्या डोळ्यात अश्रू तरळले.
"जनतेने मला सरकारच्या विरोधात कौल दिला आहे. विरोधात काम करताना अडचणी तर येणारच, म्हणून काय पक्ष बदलायचा? मी ज्या चिन्हावर निवडून आलो, त्या पक्षाशी आणि उद्धव साहेबांशी कधीही बेईमानी करणार नाही."
— राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक.