नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १७ जून - राज्याच्या आणि देशाच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत असून, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) पक्षाला स्थापना दिवसापूर्वीच आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधील फुटीनंतर महाराष्ट्रातही 'ऑपरेशन टायगर' कमालीचे यशस्वी होताना दिसत आहे. ठाकरे गटाच्या एकूण ९ पैकी ६ खासदारांनी बंडखोरी केली असून, ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या सहा खासदारांनी अखेर दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटून आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र दिले. विशेष म्हणजे, लोकसभा अध्यक्षांनी या स्वतंत्र गटाला मंजूरी दिली असून बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाच्या स्थापनेची प्रक्रिया दिल्लीत पूर्ण झाली आहे. त्यानंतर हा गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होईल.
काल रात्रीपासून ठाकरे गटाचे फुटीर खासदार एक-एक करून दिल्लीत पोहोचायला सुरुवात झाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील काल रात्रीच दिल्लीत आले होते. ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आले होते. काहीवेळापूर्वीच या सहा बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेऊन आपला स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र सादर केले. लोकसभा अध्यक्षांच्यादेखत बंडखोर आमदारांनी पत्रावर सह्या केल्या. त्यामुळे या खासदारांच्या स्वतंत्र गटाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली.
पक्षांतरबंदी कायदा काय सांगतो?
पक्षांतरबंदी कायद्यानुसार, स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आमदार किंवा खासदार संख्येच्या एकूण संख्याबळाच्या दोन तृतीयांश संख्याबळाची गरज असते. ठाकरे गटाचे एकूण नऊ खासदार आहेत. यापैकी सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यामुळे या गटाला अधिकृत मंजुरी मिळाली आहे.
ठाकरेंचे नऊ खासदार कोण
1. अनिल देसाई
2. अरविंद सावंत
3. संजय दिना पाटील
4. राजाभाऊ वाजे
5. संजय जाधव
6. संजय देशमुख
7. नागेश पाटील आष्टीकर
8. ओमराजे निंबाळकर
9. भाऊसाहेब वाकचौरे
Shivsena MPs: कोणते खासदार शिंदे गटात गेले?
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
6. संजय दिना पाटील
या संभाव्य फुटीला तेव्हा अधिक बळ मिळाले, जेव्हा नांदेड विमानतळावरून मंगळवारी संध्याकाळी ७.३० वाजता एक चार्टर्ड विमान थेट दिल्लीसाठी रवाना झाले. या विमानात परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्यासह अन्य खासदार उपस्थित होते. सद्यस्थितीत हे सर्व खासदार 'नॉट रिचेबल' झाले आहेत. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय देशमुख हे आधीच दिल्लीत तळ ठोकून आहेत, तर नागेश पाटील आष्टीकर हे हैदराबाद विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले आहेत.
तांत्रिक अडचण दूर; पक्षांतर्गत कारवाई टळणार?
पक्षांतर बंदी कायद्यानुसार, कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी मूळ पक्षाच्या एकूण लोकप्रतिनिधींपैकी किमान २/३ (दोन तृतीयांश) सदस्यांनी एकत्र येऊन निर्णय घेणे अनिवार्य असते. ठाकरे गटाचे लोकसभेत एकूण ९ खासदार आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या कारवाई टाळण्यासाठी किमान ६ खासदारांची आवश्यकता आहे. नेमका हाच आकडा गाठण्यात एकनाथ शिंदे यांना यश आल्याने, हे बंडखोर खासदार संसदेत आपला वेगळा गट स्थापन करू शकतात किंवा शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृतपणे विलीन होऊ शकतात.
'मातोश्री'वर धाकधूक; ठाकरेचे तीन शिलेदार दिल्लीत कायदेशीर सल्ल्यासाठी दाखल
१४ जून रोजी उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीला ९ पैकी केवळ ४ खासदार प्रत्यक्ष हजर होते, तर ५ अनुपस्थित होते. या बैठकीनंतरच पक्षातील अस्वस्थता समोर आली होती. आता 'ऑपरेशन टायगर'ला रोखण्यासाठी आणि कायदेशीर पळवाटा शोधण्यासाठी ठाकरे गटाचे खंदे शिलेदार खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत आणि खासदार अनिल देसाई हे तातडीने दिल्लीत दाखल झाले असून, ते तज्ज्ञांचा कायदेशीर सल्ला घेत आहेत.