नाशिक, (प्रतिनिधी) १६ जून - संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा २०२६ सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. २९ जूनपासून सुरू होणाऱ्या या पालखी सोहळ्यात यंदा भाविकांची संख्या मोठी असण्याची शक्यता लक्षात घेऊन, वारी मार्गावर वारकऱ्यांना सर्व मूलभूत सेवा-सुविधा विनाव्यत्यय उपलब्ध करून द्याव्यात, अशा कडक सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज दिल्या. तसेच त्र्यंबकेश्वर-नाशिक मार्गावरील रस्ते कामांच्या पार्श्वभूमीवर 'अपघातमुक्त वारी'साठी विशेष नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित आषाढी वारी पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.
अपघात टाळण्यासाठी रस्ते दुरुस्ती आणि वाहतूक नियंत्रण
त्र्यंबकेश्वर ते नाशिक दरम्यान सध्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी खालील महत्त्वाचे निर्देश दिले:
पालखी मार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत.
वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवावीत आणि रस्त्यावरील झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी.
वाहतूक नियंत्रणासाठी आणि अपघात टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात यावा.
मुक्कामस्थळी वारकऱ्यांची चोख व्यवस्था
पालखी मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे:
निवारा: वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी मार्गातील शाळा, सार्वजनिक इमारती व निवारा शेड उपलब्ध करून दिले जातील.
मूलभूत सुविधा: पिण्याचे व वापराचे पाणी पुरवण्यासाठी पाण्याचे टँकर्स, स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर आणि चल (मोबाईल) शौचालयांची व्यवस्था केली जाईल.
इंधन: पालखी सोहळ्यासोबत असणाऱ्या वाहनांसाठी डिझेलची पुरेशी उपलब्धता ठेवली जाईल.
आरोग्य यंत्रणा २४ तास तैनात राहणार
वारी दरम्यान वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पथके तैनात असतील. यामध्ये पुरेशा प्रमाणात डॉक्टर, परिचारिका, रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) आणि औषधांचा मुबलक साठा ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पालखी तळाच्या परिसरात स्वच्छता, पुरेशी प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षेची चोख व्यवस्था ठेवण्यावर भर दिला जाईल.
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन: महसूल, पोलीस, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, ग्रामविकास, परिवहन व स्थानिक स्वराज्य संस्था अशा सर्व विभागांनी आपापसात प्रभावी समन्वय ठेवावा. वारी मार्गावर नागरिकांच्या सुरक्षिततेची पूर्ण दक्षता घेतली जावी, जेणेकरून कोणताही अपघात किंवा अनुचित घटना घडणार नाही.
बैठकीला उपस्थित मान्यवर:
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अति. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आढे, पोलीस उपअधीक्षक वासुदेव देसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवनाथ सोनवणे, निवृत्तीनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे, सचिव श्रीपाद कुलकर्णी, पालखी सोहळा प्रमुख मनोजकुमार राठी, विश्वस्त ॲड. एस.डी. घोटेकर यांच्यासह विविध विभागांचे तहसीलदार व अधिकारी उपस्थित होते.