पुणे, (प्रतिनिधी) १६ जून - महाराष्ट्रातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या पुणे जंक्शन रेल्वे स्थानकाला आता भविष्यासाठी सज्ज असे 'मेगा टर्मिनल' बनवले जाणार आहे. स्थानकावरील प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि गाड्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन ४७३ कोटी रुपये खर्चाच्या 'पुणे यार्ड रिमॉडेलिंग', ६ नवीन प्लॅटफॉर्मचे बांधकाम आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांची पायाभरणी उद्या, बुधवार दि. १७ जून रोजी होणार आहे. केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते दुपारी ३.३० वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल.
सध्याची स्थिती: क्षमता संपल्याने विस्ताराची गरज
पुणे रेल्वे स्थानक सध्या त्याच्या कमाल क्षमता मर्यादेसह कार्यरत आहे.
स्थानकावरून दररोज २०० हून अधिक गाड्यांची ये-जा होते.
दररोज १.५ लाखांहून अधिक प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात.
सध्या येथे ६ मुख्य प्लॅटफॉर्म आहेत, परंतु त्यापैकी केवळ २ प्लॅटफॉर्मवर २२ पेक्षा जास्त डबे (कोचेस) असलेली गाडी थांबण्याची क्षमता आहे. यामुळे विस्तार करणे अत्यंत आवश्यक बनले होते.
प्रस्तावित 'हायटेक' पायाभूत कामे एका दृष्टीक्षेपात:
अ) ६ नवीन प्लॅटफॉर्म आणि मार्गिकांचा विस्तार
अतिरिक्त वाहतूक हाताळण्यासाठी ७, ८, ९, १०, ११ आणि १२ क्रमांकाचे ६ नवीन पूर्ण लांबीचे प्लॅटफॉर्म बांधले जाणार आहेत.
२४ ते २६ डब्यांची लांब पल्ल्याची गाडी सहज थांबू शकेल याकरिता सध्याच्या २, ३, ४, ५ आणि ६ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली जाईल.
गाड्यांचा वेग आणि रेल्वे कामातील लवचिकता वाढवण्यासाठी 'डबल डायमंड स्लिप' (DDS) काढली जाणार असून, गाड्या जलद गतीने जाण्यासाठी २ 'रन-थ्रू' लाईन्स तयार केल्या जातील.
उपनगरीय (लोकल) आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक वेगळी करण्यासाठी हडपसर ते घोरपडी दरम्यान तीसरी अतिरिक्त लाईन टाकली जाईल.
ब) आधुनिक सिग्नलिंग यंत्रणा
रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि आधुनिक करण्यासाठी नवीन 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग' (EI) प्रणाली आणि ३ 'ऑब्जेक्ट कंट्रोलर' इमारती उभारल्या जाणार आहेत. तसेच इंजिनच्या देखभालीसाठी 'इलेक्ट्रिक लोको शेड'ची आधुनिक सुविधा उपलब्ध केली जाईल.
प्रवाशांना मिळणाऱ्या नव्या सुविधा आणि 'तिसरे प्रवेशद्वार'
आर. बी. मिल रोडच्या बाजूने तिसरे प्रवेशद्वार: मुख्य प्रवेशद्वारावरील गर्दी कमी करण्यासाठी आर. बी. मिल रोडच्या बाजूला बुकिंग ऑफिस, टीसी कार्यालय, प्रतीक्षा कक्ष आणि प्रसाधनगृहाासह तिसरे भव्य प्रवेश/निर्गमन द्वार विकसित केले जाईल.
नवा पादचारी पूल आणि स्कायवॉक: प्रवाशांच्या सुरळीत हालचालीसाठी ६ मीटर रुंद पादचारी पूल (FOB) आणि जुन्या प्लॅटफॉर्मला नवीन प्लॅटफॉर्मशी जोडणारा एक 'स्कायवॉक' बांधला जाईल.
नव्या प्लॅटफॉर्मवर आधुनिक सोयी: आधुनिक शेड, बसण्याची उत्तम व्यवस्था, डिजिटल गाडी माहिती फलक, प्रमाणित साईन बोर्ड आणि पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था असेल.
कायमस्वरूपी होल्डिंग एरिया: सणासुदीच्या काळात किंवा गर्दीच्या वेळी प्रवाशांना थांबण्यासाठी एक विशेष 'कायमस्वरूपी होल्डिंग एरिया' विकसित केला जाणार आहे.
थोडक्यात फायदा: यार्डच्या पुनर्रचनेमुळे आणि ६ अतिरिक्त प्लॅटफॉर्ममुळे पुणे स्थानकावरील गाड्या खोळंबण्याचे प्रमाण संपेल, स्थानकावरील गर्दीचे विभाजन होईल आणि पुणेकरांना अधिक वेगवान, परवडणारा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रवास अनुभवता येईल.