चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली थेट मुख्यमंत्र्यांची मुलाखत... काय उत्तरे दिली? (बघा व्हिडिओ)

Share:
Main Image
Last updated: 16-Jun-2026

अलिबाग, (प्रतिनिधी) १६ जून - पनवेल येथील 'पीएमश्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वहाळ' येथे आयोजित शाळा प्रवेशोत्सवात एक अत्यंत आगळावेगळा आणि प्रेरणादायी प्रसंग पाहायला मिळाला. एरवी मोठ्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका इयत्ता चौथीच्या चिमुरडीने बोलते केले. या विद्यार्थिनीने थेट मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेत शिक्षण, सामाजिक कार्य आणि डिजिटल युगातील बदलांबाबत एकामागून एक थेट प्रश्न विचारले. तिच्या या आत्मविश्वासपूर्ण प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनीही तितक्याच मनमोकळेपणाने आणि आपुलकीने उत्तरे दिली. हा अनोखा संवाद यावेळच्या शाळा प्रवेशोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरला.

विद्यार्थी परिषदेतून सुरू झाला प्रवास: मुख्यमंत्री

आपल्या सार्वजनिक जीवनातील आणि राजकारणातील प्रवासाबाबत चिमुरडीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, "माझा सामाजिक आणि राजकीय प्रवास एक विद्यार्थी म्हणून 'भारतीय विद्यार्थी परिषद' (ABVP) मधून सुरू झाला. तिथे काम करताना विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न सोडवता सोडवता मी पुढे गेलो. समाजात जेव्हा आपल्याला कोणताही सकारात्मक बदल घडवून आणायचा असतो, तेव्हा संघर्ष अपरिहार्य असतो. मात्र, चांगल्या कार्यासाठी जर प्रामाणिकपणे आणि सातत्याने प्रयत्न केले, तर यश निश्चित मिळते." यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांतून आणि संघर्षातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.

डिजिटल शिक्षण ही भविष्यातील गरज

डिजिटल युगातील शिक्षणाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, डिजिटल शिक्षण ही केवळ काळाची गरज नसून भविष्यातील शिक्षण व्यवस्थेचा मुख्य आधार आहे. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वहाळ शाळेतील 'आयडियल सेंटर डिजिटल लॅब'चे उद्घाटन करण्यात आले. या डिजिटल लॅबमुळे विद्यार्थ्यांना दृकश्राव्य (ऑडिओ-व्हिज्युअल) माध्यमातून कठीण विषय अधिक प्रभावीपणे समजून घेता येतील. तसेच यात ऑनलाईन प्रश्नोत्तरे आणि स्वमूल्यमापनाची सुविधा असल्याने शिक्षण अधिक दर्जेदार आणि आकर्षक होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

नव्या विद्यार्थ्यांचे औक्षण आणि पुस्तकांचे वाटप

या कार्यक्रमात इयत्ता पहिलीमध्ये पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या नवोदित विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी आणि पालकांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. सर्व नवागत चिमुरड्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले, तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवीन पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते.

बड्या नेत्यांची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती

या प्रेरणादायी सोहळ्यास माजी खासदार रामशेठ ठाकूर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, विधान परिषद सदस्य विक्रांत पाटील, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे उपस्थित होते. तसेच शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) नेहा भोसले यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.