जागतिक पेटंट क्रमवारीत अंबानींची 'जिओ' कितव्या क्रमांकावर? अशी कामगिरी करणारी एकमेव भारतीय तंत्रज्ञान कंपनी...

Share:
Main Image
Last updated: 16-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १६ जून - भारतीय दूरसंचार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'जिओ प्लॅटफॉर्म्स'ने (Jio Platforms) जागतिक स्तरावर देशाचा नावलौकिक वाढवणारी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन (WIPO) च्या ताज्या पेटंट को-ऑपरेशन ट्रीटी (PCT) क्रमवारीत जिओने जागतिक स्तरावर 'टॉप-२०' कंपन्यांमध्ये स्थान पटकावले आहे. २०२५ च्या क्रमवारीच्या तुलनेत कंपनीने तब्बल ३२० स्थानांची विक्रमी झेप घेत २०वे स्थान मिळवले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची तंत्रज्ञान शाखा असलेली 'जिओ' ही जागतिक टॉप-२० मध्ये स्थान मिळवणारी देशातील एकमेव भारतीय तंत्रज्ञान नवोन्मेषक (Innovator) कंपनी ठरली आहे. या यशासह जिओ आता हुआवेई, सॅमसंग, क्वालकॉम, एलजी, पॅनासोनिक, नोकिया, गूगल, ॲपल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या जागतिक टेक महासत्तांच्या श्रेणीत जाऊन बसली आहे.

 प्रगत आणि 'नेक्स्ट जनरेशन' तंत्रज्ञानावर भर

जिओच्या या यशामागे प्रगत संशोधन आणि विकास (R&D) कारणीभूत आहे. कंपनीच्या पेटंट अर्जांमध्ये प्रामुख्याने पुढील पिढीच्या (Next-Gen) डिजिटल तंत्रज्ञानाचा समावेश आहे:

5G, 5G ॲडव्हान्स्ड आणि 6G तंत्रज्ञान

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि 'JioBrain' सारखे Agentic AI प्लॅटफॉर्म्स

क्लाउड-नेटिव्ह प्लॅटफॉर्म्स, एज इंटेलिजन्स आणि इंटेलिजंट ऑटोमेशन

सॅटेलाइट कम्युनिकेशन (उपग्रह दळणवळण) आणि डिजिटल सेवा पायाभूत सुविधा.

 जिओचा मजबूत पेटंट पोर्टफोलिओ (३१ मार्च २०२६ पर्यंतची आकडेवारी)

एकूण भारतात दाखल पेटंट अर्ज - २,३९३४,

आंतरराष्ट्रीय बाजारात दाखल पेटंट अर्ज - ४२४६

Advertisement

भारतात मंजूर पेटंट  ८१७

आंतरराष्ट्रीय बाजारात मंजूर पेटंट ४७१

एकूण दाखल पेटंट ६८१७

एकूण मंजूर पेटंट  १,००९

विशेष म्हणजे, जागतिक स्तरावर PCT पेटंट अर्जांच्या वाढीचा दर १ टक्क्यांपेक्षाही कमी असताना जिओने ३२० स्थानांची झेप घेतली आहे.

 ही कामगिरी 'आत्मनिर्भर भारता'ला समर्पित – आकाश अंबानी

"WIPO PCT क्रमवारीत जिओ प्लॅटफॉर्म्सचा जागतिक टॉप-२० मध्ये समावेश होणे, ही आम्ही 'डीप-टेक' कंपनी बनण्याच्या दिशेने अनेक वर्षे केलेल्या अखंड प्रयत्नांची पावती आहे. आम्ही ही ऐतिहासिक कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' या दूरदृष्टीला समर्पित करतो. हा दृष्टीकोन भारताला जगासाठी तंत्रज्ञानाचा केवळ वापरकर्ता नव्हे, तर निर्माता, मालक आणि निर्यातदार बनवण्यास प्रवृत्त करतो. भारताला जागतिक डीप-टेक महासत्ता बनवण्याच्या प्रवासात योगदान देताना जिओला अभिमान वाटतो."

– आकाश अंबानी, व्यवस्थापकीय संचालक, जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड.

तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे नवे पर्व

जिओचे हे यश भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील एका मोठ्या परिवर्तनाचे द्योतक आहे. हे परिवर्तन केवळ मोठ्या प्रमाणावर परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यापुरते मर्यादित नसून, भारतातच मूळ (IP-led) तंत्रज्ञान विकसित करून ते जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या दिशेने भारताची प्रगती दर्शवणारे आहे.

Advertisement

Comments

No comments yet.