नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महाराष्ट्रासमोर नवा आदर्श... स्वतःच्या जुळ्या मुलांना प्रवेश दिला थेट शासकीय शाळेत...

Share:
Main Image
Last updated: 15-Jun-2026

नंदुरबार, (प्रतिनिधी) १५ जून - "शासकीय शाळांचा दर्जा सुधारावा यासाठी प्रशासन नेहमीच प्रयत्न करत असते, मात्र जेव्हा एखादा सनदी अधिकारी स्वतःच्या मुलांना शासकीय शाळेत प्रवेश देतो, तेव्हा तो संपूर्ण समाजासाठी एक मोठा संदेश असतो," अशा शब्दांत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे कौतुक केले. निमित्त होते धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम तोरणमाळ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस निवासी विद्यालयात आयोजित नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या ‘प्रवेशोत्सव-आनंदोत्सव’ सोहळ्याचे! या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी स्वतःच्या जुळ्या मुलांना शासकीय शाळेत प्रवेश देऊन, शासकीय शिक्षण व्यवस्थेबाबत समाजामध्ये एक नवा विश्वास आणि आदर्श निर्माण केला आहे.

६ महिन्यांत सुविधांचा कायापालट करणार: शिक्षण मंत्री दादाजी भुसे

तोरणमाळच्या दुर्गम डोंगररांगांमधील २० शाळांचे एकत्रीकरण करून उभारण्यात आलेल्या या निवासी विद्यालयात शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री भुसे म्हणाले की, शिक्षण हाच दऱ्याखोऱ्यांतील आदिवासी बांधवांच्या प्रगतीचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.

रुग्णवाहिका अन् आरोग्य तपासणी: निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी बेड, शुद्ध पिण्याचे पाणी, सौरऊर्जा आणि स्वच्छतागृहांच्या सुविधा येत्या सहा महिन्यांत पूर्ण केल्या जातील. तसेच दरमहा विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून शाळेला रुग्णवाहिका दिली जाईल.

क्रीडा प्रबोधिनी: प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याचा शासनाचा मानस असून तोरणमाळ येथे क्रीडा अकादमी उभारण्याचा विचार सुरू आहे.

Advertisement

दुर्गम भागात देणार 'टॉप-नॉच' शिक्षण: डॉ. मित्ताली सेठी

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी प्रशासनाच्या वतीने 'टॉप-नॉच' (सर्वोच्च दर्जाचे) शिक्षण देण्यावर भर दिला. "आम्ही तोरणमाळच्या शाळेचा दर्जा इंटरनॅशनल स्कूलसारखा उंचावत आहोत. येथे केवळ पारंपरिक शिक्षण न देता सायन्स, टेक्नॉलॉजी, आधुनिक स्पोर्ट्स ट्रॅक, विज्ञान प्रयोगशाळा आणि 'मेकर्स लॅब' यांसारख्या सुविधा दिल्या जातील. शाळाबाह्य मुलांना प्रवाहात आणण्यासाठी विशेष सर्वेक्षण सुरू आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

क्रीडा व पर्यटनाची नवी पहाट: आमदार आमश्या पाडवी

कार्यक्रमात स्थानिक आमदार आमश्या पाडवी यांनी मतदारसंघातील अतिदुर्गम भागाच्या विकासाची बाजू मांडली. "आमच्या भागातील आदिवासी मुले प्रतिकूल परिस्थितीतही राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण असल्याने येथे अद्ययावत क्रीडा संकुल उभारल्यास खेळाडूंना चांगल्या संधी मिळतील. तसेच येथील महादेव मंदिर आणि यशवंत तलाव परिसराच्या पर्यटन विकासातून स्थानिकांना रोजगार मिळेल," अशी मागणी त्यांनी केली.

या सोहळ्याला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, शिक्षण उपसंचालक भावना राजनूर, शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, वंदना वळवी, 'डाएट'चे प्राचार्य डॉ. दीपक साबळे यांच्यासह अधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्याच दिवशी मोफत पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य मिळाल्याने दुर्गम भागातील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला.

Advertisement

Comments

No comments yet.