वाजत-गाजत कारमधून मिरवणूक... हाती पुस्तके आणि चेहऱ्यावर हसू... रुईपेठा शाळेत रंगला ‘प्रवेशोत्सव’...

Share:
Main Image
Last updated: 15-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १५ जून - पेठ तालुक्याच्या निसर्गरम्य कडेकपाऱ्यांमध्ये वसलेल्या रुईपेठा येथील जिल्हा परिषद शाळेत आज चिमुकल्यांचा प्रवेशोत्सव खऱ्या अर्थाने 'आनंदोत्सव' ठरला. पहिल्याच दिवशी पहिलीच्या वर्गात पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांची सजवलेल्या कारमधून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. निसर्गाच्या कुशीत भरलेल्या या अनोख्या स्वागताने विद्यार्थी आणि पालकांचे चेहरे आनंदाने न्हाऊन निघाले होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये आज सकाळी प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक शाळेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि वर्षभर गुणात्मक अहवाल तयार करण्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुईपेठा शाळेसाठी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

पहिल्याच दिवशी गणवेश आणि खाऊचे वाटप

रुईपेठा येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते आठवीचे वर्ग आहेत. यंदा पहिलीच्या वर्गात आठ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, पहिल्याच दिवशी ६ विद्यार्थी हजर झाले होते. या नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, सरपंच विनायक भोये, उपसरपंच पंडितराव भोये, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण भिवसन, मुख्याध्यापक हनुमंत खंबाईत आणि शिक्षक आनंदा काकड यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शासनातर्फे मोफत गणवेश व पुस्तके, तर बोडके यांच्याकडून खाऊचे वाटप करण्यात आले.

...तर दुसरी 'कविता राऊत' याच मातीतून घडेल: विलास बोडके

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके म्हणाले, "शाळेचे वातावरण अभ्यासास अत्यंत पूरक आहे. याच पेठच्या मातीतून आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत घडली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मनात न्यूनगंड न बाळगता जिद्दीने अभ्यास करावा. जगात अशक्य काहीच नाही. शाळेतील ग्रंथालयाचा पुरेपूर वापर करून विद्यार्थ्यांनी देशात नाव कमवावे."

Advertisement

जिल्हा परिषदेची 'हायटेक' आणि टुमदार शाळा!

रुईपेठा येथील जिल्हा परिषद शाळा खासगी शाळांना टक्कर देणारी ठरत आहे. निसर्गरम्य परिसरात असलेल्या या शाळेत खालील वैशिष्ट्ये पाहायला मिळतात:

पर्यावरणपूरक आणि डिजिटल: शाळेच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प असून शाळा पूर्णपणे डिजिटल साहित्याने सज्ज आहे. तसेच संगणक, प्रिंटर आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

८०० पुस्तकांचे समृद्ध ग्रंथालय: ग्रामपंचायत व विविध माध्यमातून शाळेत ८०० हून अधिक पुस्तकांचे ग्रंथालय उभारण्यात आले आहे.

शनिवारी 'नो दप्तर डे': दर शनिवारी विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे नसते. या दिवशी विद्यार्थी ग्रंथालयात जाऊन स्वतःच्या आवडीची पुस्तके वाचतात, अशी माहिती मुख्याध्यापक खंबाईत यांनी दिली.

शाळेत मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वीज आणि वृक्षलागवड करून निसर्गरम्य वातावरण तयार करण्यात आले असून, पहिल्याच दिवशी शाळेत गजबजाट पाहायला मिळाला.

Advertisement

Comments

No comments yet.