उपचारासाठी महाराष्ट्रात येणार हे रुग्ण... राज्य सरकारचा करार...

Share:
Main Image
Last updated: 15-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १५ जून - 'विकसित महाराष्ट्र २०४७' या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला गती देत, महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील आरोग्यसेवा केंद्र (Healthcare Hub) बनवण्यासाठी एक मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. राज्यात 'दंत पर्यटन' (Dental Tourism) क्षेत्राला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि इंडियन डेंटल असोसिएशन (IDA) यांच्यात नुकताच एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. राजशिष्टाचार, परकीय गुंतवणूक, डायसपोरा आणि आऊटरीच विभागाच्या पुढाकाराने हा करार संपन्न झाला आहे. मुंबईत आयोजित एका विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र शासनातर्फे सचिव डॉ. राजेश गवांदे व उपसचिव अविनाश सोलावट, तर 'आयडीए'तर्फे मानद सरचिटणीस डॉ. अशोक ढोबळे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

उद्देश काय?

राज्यात पर्यटनाच्या नव्या संधी निर्माण करणे, विविध क्षेत्रांमध्ये परकीय गुंतवणूक आकर्षित करणे आणि महाराष्ट्राला दंत आरोग्य व उपचारांसाठी सुरक्षित, पारदर्शक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक केंद्र म्हणून विकसित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

कराराची प्रमुख वैशिष्ट्ये आणि स्वरूप:

जागतिक दर्जाच्या सुविधा: या करारामुळे देश-विदेशातील रुग्णांना महाराष्ट्रातील अत्याधुनिक दंत उपचार सुविधा, टेलि-कन्सल्टेशन सेवा आणि इतर आवश्यक आरोग्य सेवा सहज उपलब्ध होतील.

परस्पर सहकार्य व संशोधन: दंत आरोग्य क्षेत्रातील प्रगत प्रशिक्षण, उपचार, संशोधन आणि नाविन्यपूर्ण (Innovative) उपक्रमांना चालना देण्यासाठी दोन्ही संस्था एकत्र काम करणार आहेत.

शासनाची भूमिका: मार्गदर्शन, संवाद सहाय्य आणि विविध शासकीय विभागांशी समन्वय साधण्याची जबाबदारी राज्य शासन पार पाडणार आहे.

Advertisement

'IDA' ची जबाबदारी: इंडियन डेंटल असोसिएशन प्रशिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि हितधारकांच्या सहभागासाठी आवश्यक ते तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देईल.

जागतिक स्तरावर ब्रँडिंग: दंत पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी विविध बैठका, कार्यशाळा, आंतरराष्ट्रीय परिषदा आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.

३ वर्षांचा कालावधी; आर्थिक बंधन नाही

हा करार तीन वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहणार असून तो अबाध्य (Non-Binding) आणि गैर-आर्थिक स्वरूपाचा आहे. या करारातून कोणतीही थेट आर्थिक बांधिलकी निर्माण होणार नाही. विशिष्ट प्रकल्पांसाठी भविष्यात स्वतंत्र करार केले जातील. तसेच, कोणत्याही पक्षाला ३० दिवसांची लेखी नोटीस देऊन या करारातून बाहेर पडण्याची स्वायत्तता असेल.

आर्थिक विकासाला आणि रोजगाराला बळ!

या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या आरोग्य पर्यटन (Medical Tourism) क्षेत्राला एक नवी दिशा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय रुग्णांच्या ओघामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल, तसेच आरोग्य सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि परकीय गुंतवणूक वाढेल, असा विश्वास प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.