नाशिक, (प्रतिनिधी) १५ जून - अधिक मासानिमित्त देवदर्शनासाठी नाशिकमध्ये आलेल्या छत्तीसगढमधील एका सराफ व्यावसायिकाला नाशिककरांच्या प्रामाणिकपणाचा आणि पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचा अनोखा अनुभव आला. रिक्षात विसरलेली ६३४ ग्रॅम सोन्याची लगड (सुमारे ६३ तोळे सोने) आणि ४३ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग एका प्रामाणिक रिक्षाचालकामुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या चार तासांत मूळ मालकाला सुखरूप परत मिळाली. आपली अमूल्य बॅग परत मिळाल्यानंतर व्यापारी कुटुंबाने पोलिसांचे आणि रिक्षाचालकाचे आभार मानत आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली.
रामकुंडावर स्नान करताना विसरली बॅग
रायपूर (छत्तीसगढ) येथील सोने-चांदीचे व्यापारी प्रवीण संपतलाल सोनी हे शनिवारी (दि. १३) आपल्या वयोवृद्ध आई, पत्नी आणि मुलीसह अधिक मासानिमित्त देवदर्शनासाठी नाशिकला आले होते. नाशिकमधील रस्ते आणि वाहतुकीचा अंदाज नसल्याने त्यांनी स्वतःची चारचाकी गाडी एका सुरक्षित ठिकाणी पार्क केली आणि पुढील प्रवासासाठी रिक्षा भाड्याने केली. रामकुंड येथे स्नान केल्यानंतर, सोबत आणलेली आणि लाखोंचे सोने असलेली बॅग रिक्षातच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे सोनी कुटुंबीय प्रचंड घाबरले. कसेबसे देवदर्शन आटोपून त्यांनी तातडीने नजीकचे पंचवटी पोलीस ठाणे गाठले.
रिक्षाचालकाचा देवमाणूस म्हणून परिचय
दुसरीकडे, भाविकांना सोडून पुढे गेलेल्या देविदास देशमुख (वय ६०) या प्रामाणिक रिक्षाचालकाला आपल्या रिक्षात प्रवाशांची बॅग राहिल्याचे दिसून आले. त्यांनी ती बॅग न उघडता थेट सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांच्या स्वाधीन केली. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी बॅगची पाहणी केली असता त्यात सोने आणि मोठी रोकड असल्याचे दिसले. त्यांनी वेळ न घालवता तात्काळ पोलिसांच्या अंतर्गत व्हॉट्सॲप ग्रुपवर संदेश पाठवला, "एक बॅग मिळून आली आहे, ज्यात सोने आणि रोकड आहे. यासंबंधी कोणी तक्रार घेऊन आल्यास त्यांना सरकारवाडा पोलीस ठाण्यात पाठवावे."
...आणि व्यापाऱ्याला फुटला घाम!
पंचवटी पोलीस ठाण्यात आलेल्या सोनी कुटुंबाला पोलिसांनी ग्रुपवरील तो मेसेज दाखवला आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात पाठवले. तिथे बॅगची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी आधी सोन्याची लगड बाजूला काढून ठेवली होती. पोलिसांनी सोनी यांच्यासमोर बॅग उघडली, मात्र त्यात सोन्याची लगड न दिसल्याने सोनी यांना एका क्षणासाठी घाम फुटला आणि ते निराश झाले. त्यांची पूर्ण खात्री पटल्यानंतर पोलिसांनी बाजूला ठेवलेली रोकड आणि सोन्याची लगड त्यांच्या स्वाधीन केली. नाशिकहून परतताना मुंबईतील कारागिराकडून दागिने बनवून घेण्यासाठी हे सोने सोबत आणल्याचे सोनी यांनी सांगितले.
नाशिक पोलिसांकडून चालकाचा सत्कार
अवघ्या चार तासांच्या आत लाखोंचे सोने आणि रोकड परत मिळवून देणाऱ्या पंचवटी आणि सरकारवाडा पोलिसांच्या समन्वयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच, ६० वर्षीय रिक्षाचालक देविदास देशमुख यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे नाशिक शहराची मान अभिमानाने उंचावली असून, पोलिसांनीही त्यांचे विशेष कौतुक केले आहे.