पंढरपूर, (प्रतिनिधी) १५ जून - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गेल्या तीन दिवसांपासून पंढरपुरात सुरू केलेले आपले 'अन्नत्याग आंदोलन' अखेर रात्री स्थगित केले आहे. राज्याचे भाजपचे ज्येष्ठ मंत्री आणि 'संकटमोचक' अशी ख्याती असलेले गिरीश महाजन यांनी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास आंदोलनस्थळी धाव घेत रोहित पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून दिलेल्या आश्वासनानंतर रोहित पवारांनी हे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.
तिसऱ्या दिवशी रोहित पवारांची प्रकृती ढासळली
आमदार रोहित पवार यांच्या उपोषणाचा काल तिसरा दिवस होता. सलग तीन दिवस अन्नत्याग केल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर रोहित पवारांचे बीपी (रक्तदाब) आणि शुगर (शर्करा) कमालीची कमी झाल्याचे समोर आले. डॉक्टरांनी त्यांना तातडीने सलाईन लावण्याचा सल्ला दिला होता, मात्र मंत्री गिरीश महाजन आल्यानंतरच सलाईन घेणार, अशी ठाम भूमिका रोहित पवारांनी घेतली होती. अखेर महाजन यांच्या आगमनानंतर पुढील उपचार सुरू होऊ शकले.
जखमींची भेट घेऊन गिरीश महाजन आंदोलनस्थळी दाखल
मंत्री गिरीश महाजन हे दुपारीच रोहित पवारांच्या भेटीसाठी येणार होते. मात्र, सोलापूरच्या माळशिरस येथे पीकअप विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातातील जखमींना भेटण्यासाठी ते आधी माळशिरसला गेले. तिथली परिस्थिती जाणून घेतल्यानंतर रात्री सव्वा दहाच्या सुमारास ते पंढरपूरमधील आंदोलनस्थळी पोहोचले.
२२ जूनच्या अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
आंदोलनस्थळावरूनच मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांनी रोहित पवारांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आगामी पावसाळी अधिवेशन २२ जून पासून सुरू होत असून, त्यापूर्वी रोहित पवार आणि शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत विशेष बैठक घडवून आणली जाईल आणि यातून सन्मानजनक मार्ग काढला जाईल, असे आश्वासन महाजन यांनी दिले.
चर्चेतून मार्ग निघाला असता: गिरीश महाजन
"रोहित पवार यांनी आंदोलन करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून किंवा त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपली भूमिका मांडायला हवी होती, तसे झाले असते तर चर्चेतून आधीच मार्ग निघाला असता," असे मत गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केले. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली असल्याने आंदोलन थांबवावे, अशी विनंती त्यांनी केली.
श्री नामदेव पायरीवर सोडले उपोषण
मंत्री महाजन आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवत रोहित पवार यांनी आपले अन्नत्याग आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. "पंढरपुरातील पवित्र श्री संत नामदेव पायरीवर नतमस्तक होऊनच आपण उपोषण सोडू," अशी भूमिका रोहित पवारांनी मांडली. त्यानंतर सर्व नेते आणि कार्यकर्त्यांसह त्यांनी विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीचे दर्शन घेऊन उपोषणाची सांगता केली.