ठाणे, (प्रतिनिधी) १४ जून - अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे परिसरात अवैधरित्या साठवून ठेवलेल्या ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’च्या मोठ्या साठ्यावर राज्य दक्षता पथकाने रविवारी धडक कारवाई केली. या धडक कारवाईत पथकाने सुमारे एक कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. टँकरचे सील तोडून इंधनाचा काळाबाजार सुरू असतानाच पथकाने हा छापा टाकला. या प्रकरणात संबंधित संशयितांविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अवैध इंधन साठवणूक आणि काळाबाजाराविरोधातील ही एक मोठी कारवाई मानली जात आहे. नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे (भा.प्र.से.) यांना मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे राज्य दक्षता पथकाने अंबरनाथ येथील उसाटणे भागातील न्यूओ लॉजिस्टिक पार्क परिसरात, राज्यस्तरीय प्लॉट क्रमांक २० समोर हा छापा टाकला.
टँकरचे सील तोडून सुरू होता काळाबाजार
दक्षता पथकाने छापा टाकला तेव्हा घटनास्थळी टँकरचे सील तोडून ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ची बेकायदेशीर साठवणूक व देवाणघेवाण सुरू असल्याचे उघडकीस आले. या बेकायदेशीर प्रकारात दोन व्यक्ती प्रत्यक्ष सहभागी असल्याचे पथकाला आढळून आले.
कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेली वाहने आणि साहित्य:
टँकर क्रमांक (GJ-12 BY-7560): हा टँकर पूर्णपणे भरलेला आढळला. यामध्ये सुमारे २९ हजार ७०० किलो मिक्स हायड्रोकार्बन ऑईल जप्त करण्यात आले.
टँकर क्रमांक (MH-43 E-190): हा टँकर घटनास्थळी उभा असून त्यामध्ये इलेक्ट्रिक मोटारीच्या सहाय्याने इंधन साठवण्याचे काम सुरू होते.
टेम्पो क्रमांक (MH-46 C-1282): या वाहनात २०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक बॅरलमध्ये तेलाची बेकायदेशीर साठवणूक सुरू होती. तसेच २२० लिटर क्षमतेचे २० रिकामे प्लास्टिक बॅरल्स देखील यात आढळले.
इतर साहित्य: घटनास्थळी जमिनीवर ठेवलेले आणखी ८० रिकामे बॅरल्स, एक इलेक्ट्रिक मोटार आणि एक एअर ऑपरेटेड डायाफ्राम (AOD) पंप जप्त करण्यात आला.
कागदपत्रांशिवाय अवैध साठवणूक
प्राथमिक तपासात या संपूर्ण साठ्याबाबत संबंधितांकडे कोणतेही आवश्यक परवाने किंवा वैध कागदपत्रे नसल्याचे समोर आले आहे. या सर्व साहित्य, वाहने आणि इंधनासह एकूण सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अवैध इंधन साठवणूक, वाहतूक आणि काळाबाजाराशी संबंधित इतर धागेदोरे शोधण्यासाठी तपास केला जात आहे.
प्रशासनाचा कडक इशारा
"इंधनाच्या अशा अवैध साठवणुकीमुळे शासनाचे मोठे महसुली नुकसान तर होतेच, शिवाय सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे बेकायदेशीर साठवणूक, वाहतूक आणि काळाबाजाराविरोधातील मोहिमा आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येतील."
– शिधावाटप प्रशासन, ठाणे.
या पथकाने केली कामगिरी:
ही कारवाई नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी योगेश जंगले, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे तसेच शिधावाटप निरीक्षक रामराजे भोसले, चंद्रकांत कांबळे, विकास नागदिवे, रवींद्र राठोड, राजेश सोरते, देवानंद थोरवे, पवन कुंभले, राहुल इंगळे आणि अरुण काते यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.