पुणे, (प्रतिनिधी) १४ जून - मराठी सारस्वत विश्वातून अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. मराठी साहित्य विश्वातील मैलाचा दगड ठरणारे ऐतिहासिक १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार आहे. आगामी वर्षात २८ ते ३१ जानेवारी या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विस्तीर्ण प्रांगणात हा ज्ञानोत्सव रंगणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष योगेश सोमण यांनी पत्रकार परिषदेत ही अधिकृत घोषणा केली. या पत्रकार परिषदेला प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात आयोजित करण्यात येणाऱ्या या शंभराव्या संमेलनाच्या स्थळाची अधिकृत घोषणा १४ जून रोजी महामंडळाच्या बैठकीनंतर करण्यात आली. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सहसंयोजक म्हणून लोकहितवादी यांनी स्थापन केलेली 'पुणे नगर वाचन मंदिर' आणि 'पुणे पुस्तक महोत्सव' या दोन नामांकित संस्था इच्छुक होत्या.
साहित्य महामंडळाची नवी कार्यकारिणी; पुरुषोत्तम सप्रे उपाध्यक्षपदी
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष व प्रभारी अध्यक्ष रे. गुरय्या स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत योगेश सोमण (अध्यक्ष), स्वाती महाळंक (प्रमुख कार्यवाह) आणि प्रदीप निफाडकर (कोषाध्यक्ष) यांनी साहित्य महामंडळाचे नवनियुक्त पदाधिकारी म्हणून अधिकृतपणे आपली सूत्रे स्वीकारली. रे. गुरय्या स्वामी यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने, त्यांच्या जागी मध्य प्रदेश साहित्य संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे (भोपाळ) यांची महामंडळाच्या उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
स्थळ निवड समितीच्या पाहणीनंतर शिक्कामोर्तब
अध्यक्ष योगेश सोमण यांनी सांगितले की, "आगामी शंभरावे संमेलन पुण्यात आयोजित करण्याची घोषणा महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा येथील ९९ व्या संमेलनातच केली होती. त्यानुसार स्थळ निश्चितीसाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीमध्ये महामंडळाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांसह प्रतिभा सराफ (मुंबई मराठी साहित्य संघ), रामचंद्र काळुंखे (मराठवाडा साहित्य परिषद) आणि लखनसिंह कटारे (विदर्भ साहित्य संघ) यांचा समावेश होता. या समितीने १२ आणि १३ जून रोजी पुण्यातील संभाव्य संमेलन स्थळांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर १४ जून रोजी झालेल्या बैठकीत सादर केलेल्या अहवालानुसार 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' या स्थळावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले."
दुबईच्या 'विश्व साहित्य संमेलना'चे निमंत्रण तूर्तास लांबणीवर
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह सुनील महाजन आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे सचिन ईटकर यांच्या माध्यमातून दुबई येथील महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष अजय भांगे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला 'विश्व साहित्य संमेलनाचे' निमंत्रण दिले आहे.
"शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा सोहळा आहे. त्यामुळे हे संमेलन पार पडत नाही, तोपर्यंत अन्य कोणत्याही स्वरूपाचे किंवा परदेशातील संमेलन आयोजित करू नये, असा धोरणात्मक निर्णय महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पुण्याचे १०० वे संमेलन दिमाखात पार पडल्यानंतरच दुबईच्या या निमंत्रणाचा सकारात्मक विचार केला जाईल."
– योगेश सोमण, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ.