दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १३ जून - नाशिक ग्रामीण पोलीस दलातील अंमलदारांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रशासकीय कारणांमुळे रेंगाळलेली पदोन्नतीची (बढती) प्रक्रिया अखेर मार्गी लागली आहे. नाशिक ग्रामीणचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांनी पदभार स्वीकारताच अंतर्गत कामकाजाचा तातडीने आढावा घेतला. त्यानुसार, सेवाज्येष्ठतेनुसार कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या ४७ हवालदारांना सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) पदावर पदोन्नती देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. एकूण ५० हवालदारांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असून उर्वरित जागाही लवकरच भरल्या जाण्याची शक्यता आहे. पोलीस अधीक्षकांच्या या जलद आणि सकारात्मक निर्णयामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांचे खाकी वर्दीतील अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
'टोलवाटोलवी' संपली; कर्मचाऱ्यांचा आर्थिक फटका टळला
ग्रामीण पोलीस दलात गेल्या काही वर्षांपासून बढती प्रक्रिया रखडलेली होती. सेवाज्येष्ठतेचा काळ संपूनही अनेक अंमलदारांना त्याच पदावर काम करावे लागत होते. यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते, तर दुसरीकडे अनेक ज्येष्ठ कर्मचारी अधिकारी न बनताच सेवानिवृत्त झाल्याने नाराज होते. या ना त्या कारणाने होणारी टोलवाटोलवी संपवून अधीक्षक स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून आणि शासन निर्णयातील तरतुदींनुसार हा प्रलंबित प्रश्न निकाली काढला आहे.
वेतनश्रेणीत सुधारणा, आर्थिक हातभार लागणार
गुरूवारी (दि. ११) जारी करण्यात आलेल्या अधिकृत आदेशानुसार, पदोन्नती मिळालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आता सहाय्यक उपनिरीक्षक पदाची वरिष्ठ वेतनश्रेणी (Pay Scale) लागू होणार आहे. त्यामुळे त्यांच्या मासिक वेतनात घसघशीत वाढ होणार असून, त्यांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
जनतेचे प्रश्न आणि पोलिसांचे कल्याण; एसपी स्वामींचा 'मल्टीटास्किंग' पॅटर्न:
पदभार स्वीकारल्यापासून पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांनी जिल्ह्यात कामाचा धडाका लावला आहे:
जागेवरच तक्रारींचा निपटारा: जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात 'जनता दरबार' भरवून ते नागरिकांच्या तक्रारी थेट सोडवत आहेत.
कडक शिस्त: कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.
तणावमुक्ती व आरोग्य: पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य, कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी विविध सुखसुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला आहे.
रिक्त पदांचा आढावा घेऊन न्याय दिला!
"पोलीस दलातील पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदांचा सखोल आढावा घेण्यात आला. नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबवून कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यात आला आहे. यामुळे पोलिसांचे मनोबल वाढण्यास मदत होईल."
— नाशिक ग्रामीण पोलीस प्रशासन.