मनोहर शिंदे, (नाशिक) १३ जून - उन्हाळी सुटीच्या आनंदी आठवणींची शिदोरी घेऊन चिमुकली पावले सोमवारपासून (१५ जून) पुन्हा एकदा ज्ञानमंदिराच्या उंबरठ्यावर येणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील या नव्या शैक्षणिक पर्वाचे स्वागत करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्यासह जिल्ह्यातील तब्बल १,१२८ वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सोमवारपासून विविध शाळांमध्ये हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे, हे अधिकारी केवळ पहिल्याच दिवशी जाणार नसून, ते वर्षभरासाठी या शाळा दत्तक घेणार आहेत. यामुळे ग्रामीण भागातील शासकीय शाळांचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली 'आनंददायी शिक्षण'
विज्ञान सांगते की, शिक्षण आनंददायी असेल तर मुलांचा सर्वांगीण विकास वेगाने होतो. मुलांना शाळेची गोडी लागावी आणि शाळा गळतीचे प्रमाण शून्यावर यावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे.
या अंतर्गत सोमवारच्या पहिल्या दिवशी वर्ग १ आणि वर्ग २ चे वरिष्ठ अधिकारी स्वतः शाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करतील. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे स्वतः नाशिक महानगरपालिकेच्या शिवाजीनगर येथील शाळा क्रमांक २१ मध्ये उपस्थित राहून चिमुकल्यांचे स्वागत करणार आहेत, तर इतर नियुक्त अधिकारी जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये उपस्थित राहतील.
'दत्तक शाळा' उपक्रमात अधिकारी काय करणार?
अधिकारी वर्षभरासाठी संबंधित शाळा दत्तक घेणार असून, ते वेळोवेळी शाळेला भेटी देऊन खालील बाबींवर लक्ष केंद्रित करतील:
प्रवेश वाढवणे: शाळा व्यवस्थापन समिती आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेतील प्रवेश कसा वाढेल, यासाठी उपाययोजना करणे.
सुविधांची तपासणी: शाळेतील भौतिक सुविधा, खेळाचे मैदान, पूरक व्यवस्था आणि शालेय पोषण आहाराच्या दर्जाची पाहणी करणे.
आरोग्य व स्वच्छता: विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावण्याबाबत मार्गदर्शन करणे.
तात्काळ दुरुस्ती: शाळेत धोकादायक बांधकाम किंवा पाण्याअभावी बंद असलेली शौचालये आढळल्यास संबंधित यंत्रणेला तातडीने काम करण्याचे आदेश देणे.
शिक्षणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणार!
"हा उपक्रम केवळ प्रशासकीय भेट नाही, तर समाज आणि पालकांचा शासकीय शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करण्यासाठी आहे. पालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
— आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी) व ओमकार पवार (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.)
प्रशासनाच्या या 'दत्तक शाळा' मोहिमेमुळे शाळांचा शैक्षणिक व भौतिक दर्जा सुधारण्यास मोठी मदत होणार असून, पालकांमध्येही जिल्हा परिषद आणि मनपा शाळांबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण होत आहे.