नाशिक, (प्रतिनिधी) १३ जून - कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन आरोपींना दोषी ठरवले आहे. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली असून, दंड न भरल्यास संबंधित आरोपींना सात दिवस साध्या कारावासाची शिक्षा भोगण्याचे आदेश निकालपत्रात दिले आहेत. सन २०१८ मध्ये शहरातील नेपाळी कॉर्नर भागात हा प्रकार घडला होता. या खटल्यात शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे राजेश प्रेमजी मामरू आणि भावना प्रेमजी मामरू (दोघे रा. फुलपाखरू देशी दारू दुकानावरती, नेपाळी कॉर्नर जवळ, नाशिक) अशी आहेत.
पंचनामा करताना केली होती हुसकावणी
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, भद्रकाली पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले तत्कालीन सहाय्यक उपनिरीक्षक त्र्यंबकगिर दगुगीर गोसावी (वय ५०) हे ७ मे २०१८ रोजी सरकारी कामानिमित्त आरोपींच्या घर परिसरात गेले होते. एका गुन्ह्याच्या तपासकामी जमादार गोसावी हे घटनास्थळी आवश्यक असलेला कायदेशीर पंचनामा करत होते.
याचा राग धरून संशयित राजेश मामरू आणि भावना मामरू यांनी शासकीय कामात थेट हस्तक्षेप केला. त्यांनी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना अद्वातद्वा शिवीगाळ केली आणि त्यांना घटनास्थळावरून बळजबरीने बाहेर हाकलून दिले. या प्रकरणी जमादार गोसावी यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सरकारी पुरावे ठरले महत्त्वाचे
हा खटला नाशिकच्या कोर्ट क्र. १ चे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. के. लहोटी यांच्या न्यायालयासमोर चालला. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जगदीश सोनवणे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.
न्यायालयाने फिर्यादी पोलीस अधिकारी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि पंच यांनी दिलेली साक्ष तसेच तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरले. गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने दोन्ही आरोपींना प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.