दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) ११ जून - नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मौजे सावरगाव येथील धरण (बॅक वॉटर) परिसरात आज, गुरुवारी (दि. ११) दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास फिरायला गेलेले चार तरुण-तरुणी पाण्यात बुडून मयत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांमध्ये सावरगाव येथीलच १६ वर्षांच्या तीन शाळकरी मित्रांचा आणि एका २१ वर्षीय तरुणीचा समावेश आहे. या भीषण दुर्घटनेमुळे सावरगाव आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दुपारी फिरायला गेले अन् घात झाला!
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, आज दुपारी सावरगाव येथील धरण परिसरात काही तरुण-तरुणी फिरायला गेले होते. दुपारी ४ वाजून १० मिनिटांच्या सुमारास पाण्याचा अंदाज न आल्याने किंवा पाय घसरल्याने हे चौघे जण धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडाले. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने शोधमोहीम राबवली, मात्र दुर्दैवाने चौघांचेही मृतदेह हाती आले आहेत.
अपघातातील दुर्दैवी मृतांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. गणेश सुरेश गोतरणे (वय १६, रा. सावरगाव)
२. साहिल मनोहर गोतरणे (वय १६, रा. सावरगाव)
३. निखिल मच्छिंद्र गोतरणे (वय १६, रा. सावरगाव)
४. मयुरी पवन जाधव (वय २१, रा. तळेगाव अंजनेरी)
तीन घरातील 'दिवे' विझले; सावरगावात एकच आक्रोश
मृतांमधील गणेश, साहिल आणि निखिल हे तिघेही एकाच वयाचे (१६ वर्षे) असून सावरगावचेच रहिवासी होते. एकाच गावातील तीन उमलत्या वयाच्या मुलांचा एकाच वेळी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने सावरगाववर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील तीनही घरांचे कुलदीपक अचानक विझल्याने पालकांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. तर तळेगाव अंजनेरी येथील मयुरी पवन जाधव ही विवाहित असून रा. चौकीमाथा, त्र्यंबकेश्वर तिला दोन वर्षांची मुलगी आहे. आपल्या मामाच्या मुलासोबत ती गेली होती.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नजीकच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.