पुण्यात 'कॉक्रोच जनता पार्टी' रस्त्यावर... तरुणांची तुफान गर्दी... आंदोलकांनी केल्या या प्रमुख ५ मागण्या...

Share:
Main Image
Last updated: 11-Jun-2026

पुणे, (विशेष प्रतिनिधी) ११ जून - वैद्यकीय प्रवेशासाठी झालेल्या 'नीट' (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि सीबीएसई (CBSE) परीक्षांमधील गोंधळावरून देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. या प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी पुण्यात 'कॉकरोच जनता पार्टी'च्या वतीने आज एक मोठे आणि लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर झालेल्या या आंदोलनाला विद्यार्थी, पालक आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून तरुणांचा आवाज उठवणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनात प्रसिद्ध समाजसेवक सोनम वांगचूक आणि चळवळीचे मुख्य समन्वयक अभिजित दीपके यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली होती. आंदोलनाच्या सुरुवातीला हैदराबाद विद्यापीठातील दिवंगत विद्यार्थी रोहित वेमुला याला सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 '२० जूनपर्यंत राजीनामा द्या, अन्यथा दिल्लीत धडकणार!'

आंदोलनाचे नेतृत्व करणारे मुख्य समन्वयक अभिजीत दीपके यांनी केंद्र सरकारला थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले, "पेपरफुटीला जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई होईपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जर आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही, तर आगामी २० जून रोजी दिल्लीत देशातील विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन उभे केले जाईल."

यावेळी आंदोलकांनी धार्मिक राजकारणावरही कडक प्रहार केला. "यापुढे देशातील तरुण पिढी कोणत्याही हिंदू-मुस्लिम किंवा धार्मिक राजकारणाला बळी पडणार नाही. सरकारचे हे धार्मिक राजकारण आता चालणार नाही," असा इशाराही पक्षाच्या वतीने देण्यात आला.

 "चोरून पहाटेचा शपथविधी घेणे कोणत्या संविधानात लिहिलंय?" : मुख्यमंत्र्यांवर घणाघात

अभिजीत दीपके यांनी मुख्यमंत्र्यांकडून होणाऱ्या टीकेला चोख उत्तर दिले. ते म्हणाले, "मुख्यमंत्री म्हणतात की आंदोलनात सहभागी झालेले लोक समाजात अराजकता पसरवत आहेत. मला मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे की, स्वतःच्या हक्कासाठी लढणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे म्हणजे अराजकता पसरवणे आहे का? मुख्यमंत्री टीका करतात की आम्हाला संविधान माहीत नाही, आम्ही फक्त पुस्तक हातात पकडले आहे. मला त्यांना उलट विचारायचं आहे की, चोरून पहाटेचा शपथविधी पार पाडणे कोणत्या संविधानात लिहिलं आहे, ते आधी त्यांनी स्पष्ट करावे."

Advertisement

 आंदोलनकर्त्यांच्या 'या' आहेत प्रमुख ५ मागण्या:

विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयासमोर खालील प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या आहेत:

१. नुकसानभरपाई: जर कोणत्याही परीक्षेचा पेपर फुटला, तर त्याचा फटका बसलेल्या प्रत्येक प्रभावित विद्यार्थ्याला शासनाकडून १०,००० रुपये आर्थिक नुकसानभरपाई मिळाली पाहिजे.

२. कंपन्यांचे कडक ऑडिट: परीक्षा आयोजित करण्यासाठी टेंडर घेणाऱ्या कंपन्यांचे कडक ऑडिट झाले पाहिजे. मंत्र्यांच्या जवळच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना अशी टेंडर्स मिळता कामा नयेत.

३. वेळेत निकाल: सर्व स्पर्धा परीक्षांचे निकाल एका ठराविक आणि निश्चित मुदतीतच जाहीर झाले पाहिजेत.

४. प्रवास खर्च: ग्रामीण व इतर भागांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्या-जाण्याचा संपूर्ण वाहतूक खर्च शासनाने उचलला पाहिजे.

५. शिवरायांचा इतिहास: NCERT च्या पाठ्यपुस्तकातून वगळलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'हिंदवी साम्राज्याचा नकाशा' अभ्यासक्रमात पुन्हा समाविष्ट करण्यात यावा.

Advertisement

Comments

No comments yet.