पुण्याच्या विषारी दारूकांडानंतर नाशिकमध्ये मोठी कारवाई... शंभरहून अधिक हातभट्ट्या उद्ध्वस्त, ६८ जणांना बेड्या...

Share:
Main Image
Last updated: 10-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १० जून - पुणे येथे घडलेल्या विषारी दारूकांडानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग खडबडून जागा झाला आहे. नाशिक जिल्ह्याचे अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यापासून धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. वेगवेगळ्या पथकांनी जिल्ह्यातील गावपाड्यांसह दुर्गम डोंगर-दऱ्या तुडवत तब्बल १०० हून अधिक अवैध हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. या कारवाईत ६८ संशयितांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, तब्बल २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

डोंगर-दऱ्यांमध्ये छापेमारी; ९१ गुन्हे दाखल

पुण्याच्या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी संपूर्ण जिल्हा पायदळी तुडवला. या मोहिमेत ७० वारस तर २१ बेवारस हातभट्ट्या शोधून काढून त्या जागीच नष्ट करण्यात आल्या. या धडक कारवाईत एकूण ९१ गुन्हे दाखल करण्यात आले असून, फरार असलेल्या २१ बेवारस हातभट्टी मालकांचा शोध घेतला जात आहे.

२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

या पंधरवड्यातील कारवाईत एकूण २४ लाख ९८ हजार ६१५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये खालील घटकांचा समावेश आहे:

गावठी दारू: २ हजार ५४९ बल्क लिटर

रसायन (कच्चा माल): ५९ हजार ४३० बल्क लिटर

गेल्या ५ महिन्यांतील एकूण कारवाईचा धडाका

Advertisement

उत्पादन शुल्क विभागाने केवळ पंधरवड्यातच नव्हे, तर गेल्या पाच महिन्यांत अवैध दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई केली आहे.

५ महिन्यातील आकडेवारी 

दाखल गुन्हे ४३४ 

अटक आरोपी २८६ जणांना बेड्या

एकूण जप्त मुद्देमाल १ कोटी १७ लाख ३८ हजार १२५ रुपये

जप्त वाहने ८ वाहने

गावठी दारू व रसायन १७ हजार २६६ बल्क लिटर दारू आणि २.२१ लाख किमतीचे रसायन 

कारवाई अधिक तीव्र करणार!

"पुण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती आणि विक्री खपवून घेतली जाणार नाही. ग्रामीण आणि दुर्गम भागात ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार असून, अवैध धंदे करणाऱ्यांवर मोक्का किंवा तडीपारीसारखी कडक कारवाई केली जाईल."— राज्य उत्पादन शुल्क विभाग, नाशिक

Advertisement

Comments

No comments yet.