७२ वाहनतळ, ३ लाख वाहन क्षमता, विशेष बससेवा... अमृत स्नानाच्या दिवशी असे असेल वाहतुकीचे नियोजन... त्रिस्तरीय पार्किंग आराखडा तयार...

Share:
Main Image
Last updated: 10-Jun-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) १० जून - सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान अमृत स्नानाच्या मुख्य पर्वण्यांच्या दिवशी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर शहरात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडून तब्बल ३ लाख वाहन क्षमतेचा 'तीनस्तरीय (Three-Tier) वाहनतळ आराखडा' तयार करण्यात आला आहे. अमृत स्नानाच्या दिवशी सर्व खासगी वाहने शहराच्या वेशीवरच थांबवली जाणार असून, तेथून भाविकांना विशेष बससेवेने घाटापर्यंत नेले जाईल.

कुठे किती पार्किंग?

कुंभमेळ्याच्या प्राथमिक नियोजनानुसार दोन्ही शहरांमध्ये मिळून सुमारे १५५९ हेक्टर क्षेत्रावर ७२ वाहनतळ विकसित केले जाणार आहेत:

नाशिक शहर: ८८८ हेक्टर क्षेत्रावर ४६ वाहनतळ

त्र्यंबकेश्वर: ६७१ हेक्टर क्षेत्रावर २६ वाहनतळ

काय आहे तीनस्तरीय (थ्री-टियर) व्यवस्था?

शहरात येणाऱ्या प्रमुख महामार्गांवर वाहतुकीचा ताण विभागण्यासाठी ही रचना करण्यात आली आहे:

Advertisement

१. पहिला स्तर (आऊटर पार्किंग): शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य महामार्गांवर दूर अंतरावर वाहने थांबवली जातील.

२. दुसरा स्तर (आऊटर-१ पार्किंग): हा स्तर वाहतुकीचा ताण नियंत्रित करण्यासाठी 'बफर झोन' म्हणून काम करेल.

३. तिसरा स्तर (इनर पार्किंग): या अंतिम पार्किंग क्षेत्रापर्यंत केवळ एसटी महामंडळाच्या बसेसनाच प्रवेश असेल. येथून पुढे घाट परिसरापर्यंत भाविकांना पायी जावे लागेल.

३ हजार एसटी बसेस धावणार; मूलभूत सुविधांवर भर

बाह्य वाहनतळांवरून भाविकांना थेट घाट परिसरापर्यंत पोहोचवण्यासाठी सुमारे ३ हजार एसटी बसेसच्या माध्यमातून 'शटल सेवा' चालवण्याचे नियोजन आहे. या सर्व ७२ वाहनतळांवर दुचाकी, चारचाकी आणि बसेससाठी स्वतंत्र कप्पे असतील. तसेच येथे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि सावलीची व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवल्या जाणार आहेत. २०१५ च्या कुंभमेळ्यातील त्रुटींचा अभ्यास करूनच या नवीन जागांची निवड करण्यात आली आहे.

भाविकांचा प्रवास सुलभ व्हावा हाच उद्देश!

"अमृत स्नानासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, हा या नियोजनामागील मुख्य उद्देश आहे. भाविकांनी वाहने पार्क केल्यानंतर घाटापर्यंतचा पुढील प्रवास विनाअडचण आणि सुरक्षित व्हावा यासाठी ही तीनस्तरीय व्यवस्था महत्त्वपूर्ण ठरेल."

— शेखर सिंह, आयुक्त, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण

Advertisement

Comments

No comments yet.