गुटखा माफियांचा उच्छाद... महिला अधिकाऱ्याला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न...

Share:
Main Image
Last updated: 10-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १० जून - अवैध गुटखा माफियांविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका महिला अन्न सुरक्षा अधिकाऱ्याच्या अंगावर थेट वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक आणि गंभीर घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. या भ्याड हल्ल्याची अन्न व औषध प्रशासन (FDA) मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी पीडित महिला अधिकाऱ्याशी फोनवरून थेट संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि 'शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,' असा विश्वास दिला. "शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या गुटखा माफियांची गय केली जाणार नाही. त्यांची पाळेमुळे खणून काढू," असा तीव्र इशारा मंत्री झिरवाळ यांनी दिला आहे.

'एफडीए'च्या धडक मोहिमेमुळे माफियांचे धाबे दणाणले

अन्न व औषध प्रशासन विभागाने गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात गुटखा, अमली पदार्थ आणि बनावट अन्नपदार्थांच्या विक्रीविरोधात तीव्र मोहीम हाती घेतली आहे. या सातत्यपूर्ण कारवायांमुळे राज्यातील अवैध गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत. या धडक मोहिमांना खीळ घालण्यासाठी आणि प्रशासनावर दबाव आणण्यासाठीच समाजविघातक प्रवृत्तींकडून अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले केले जात असल्याचे समोर येत आहे.

गुन्हेगारांवर होणार कडक कायदेशीर कारवाई

Advertisement

मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन विभागाला संयुक्तपणे तात्काळ पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि दोषींवर कठोरतम कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. "आमच्या अधिकाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही दबावतंत्राला किंवा गुंडगिरीला शासन बळी पडणार नाही," असे झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची खैर नाही!

"अवैध गुटखा विक्रीतून जनतेच्या आणि विशेषतः तरुण पिढीच्या आरोग्याशी खेळणाऱ्या गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा माफियांचा बिमोड करणे अत्यंत गरजेचे असून, एफडीएची ही मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरूच राहील."

— नरहरी झिरवाळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.