मुंबई, (प्रतिनिधी) १० जून - अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, गरिबी आणि समाजातील रूढ परंपरांना छेद देत जिद्दीच्या बळावर थेट लंडन येथील नामांकित विद्यापीठात 'एलएलएम' (मास्टर ऑफ लॉ) उच्च शिक्षणासाठी पात्र ठरलेल्या कातकरी समाजातील सपना चंद्रभागा राजेश वाघमारे हिचा मंत्रालयात विशेष सत्कार करण्यात आला. "दुर्गम आणि वंचित भागातील मुलींनी उच्च शिक्षणासाठी सपनाचा आदर्श घ्यावा," असे गौरवोद्गार राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी काढले. तसेच सपनाच्या परदेशी शिक्षणाचा संपूर्ण खर्च आणि आवश्यक ते सर्व सहकार्य शासन करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
आई-वडील ऊसतोड मजूर; मामा-मामीने दिली शिक्षणाची साथ
रायगड जिल्ह्यातील आदिवासी कातकरी समाजातील सपनाची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत गरिबीची आहे. तिचे आई-वडील ऊसतोडणी आणि कोळसा भट्ट्यांवर मजुरीचे काम करतात. कामासाठी सतत करावे लागणारे स्थलांतर आणि समाजात असलेल्या अल्पवयीन विवाहाच्या (बालविवाह) प्रथेमुळे मुलींचे शिक्षण अनेकदा अपूर्ण राहते. मात्र, सपनाने बालविवाहाला ठाम नकार दिला. तिचे मामा भिवा पवार आणि मामी ज्योत्स्ना पवार यांनी तिला सोबत घेऊन मोठ्या जिद्दीने तिचे शिक्षण पुढे सुरू ठेवले. ६ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण तिने शासकीय वनवासी कल्याण आश्रमशाळेत पूर्ण केले आणि पुढे 'एलएलबी'ची (कायद्याची) पदवी संपादन केली.
आदिवासी महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी वकिलीचे शिक्षण
सत्कार सोहळ्यात भावना व्यक्त करताना सपना म्हणाली, "आदिवासी महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण खूप कमी आहे. स्थलांतरामुळे अनेक मुलींचे शिक्षण अर्धवट सुटते आणि त्यांचे लवकर लग्न लावून दिले जाते. यामुळे त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरोधात त्यांना आवाज उठवता येत नाही. मीसुद्धा त्यांच्यापैकीच एक आहे. म्हणूनच मी कायद्याचे क्षेत्र निवडले असून, शिक्षणाच्या माध्यमातून माझ्या समाजातील महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मी आयुष्यभर प्रयत्न करेन."
शासन करणार परदेशी शिष्यवृत्तीचा संपूर्ण खर्च
मंत्रालयातील कार्यक्रमात मंत्री आदिती तटकरे यांनी सपनाच्या इच्छाशक्तीचे कौतुक केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत सपनाला लंडनमध्ये शिक्षणासाठी परदेशी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. "संविधानाने महिलांना शिक्षणाचा आणि समानतेचा अधिकार दिला आहे. कातकरी समाजातील मुलींसाठी सपनाचे हे यश ऐतिहासिक असून, शिक्षणाच्या बळावर कोणतीही आंतरराष्ट्रीय उंची गाठता येते, याचे ती उत्तम उदाहरण आहे. तिच्या प्रवासात शासन तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील," असे मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले.