९६ गुण मिळूनही अपात्र, ४६ गुणांवर 'पात्र'... MPSC च्या अजब नियमांमुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर संक्रांत...

Share:
Main Image
Last updated: 09-Jun-2026

मुंबई/पुणे, (प्रतिनिधी) ९ जून - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षांमध्ये रात्रंदिवस मेहनत करून लेखी परीक्षेत उत्कृष्ट गुणांची कमाई करणाऱ्या उमेदवारांना केवळ मुलाखतीतील एका गुणाच्या अटीमुळे अंतिम निवडीपासून वंचित राहावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयोगाच्या जाहिरात क्र. १३१ अंतर्गत असलेल्या 'सहायक संचालक (माहिती)' पदाच्या भरती प्रक्रियेवरून उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, "लेखी परीक्षेत अव्वल ठरलेल्यांची गुणवत्ता जर एका गुणासाठी कचऱ्याच्या डब्यात फेकली जाणार असेल, तर महिनोनमहिने घेतलेल्या मेहनतीचा उद्देश काय?" असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

९६ गुणांचा उमेदवार घरी, ४६ गुणांचा होणार अधिकारी!

उमेदवारांनी आयोगाच्या या अन्यायी नियमावर बोट ठेवताना एक डोळे उघडणारे उदाहरण दिले आहे. सध्याच्या नियमांनुसार, एखाद्या उमेदवाराला लेखी परीक्षेत १०० पैकी तब्बल ९६ गुण मिळाले, तरीही मुलाखतीसाठी निश्चित केलेल्या किमान पात्रता गुणांपेक्षा (Minimum Cut-off) अवघा १ गुण कमी मिळाला तर तो थेट अपात्र ठरवला जातो. दुसरीकडे, लेखी परीक्षेत जेमतेम ४६ गुण मिळवणारा आणि मुलाखतीत कसाबसा पात्रता गुणांचा (उदा. २१ गुण) टप्पा पार करणारा उमेदवार थेट अधिकारी पदासाठी पात्र ठरतो. एकूण गुणसंख्येत तब्बल ३० ते ४० गुणांचा फरक असूनही केवळ मुलाखतीच्या एका गुणाच्या अटीमुळे गुणवंत उमेदवार बाहेर फेकला जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र खदखद आहे.

अंतिम निर्णय मुलाखतीवरच, तर लेखी परीक्षा घेता कशाला?

Advertisement

"आम्ही लेखी परीक्षेसाठी रात्रंदिवस एक करून गुणवत्ता सिद्ध करतो. जर अंतिम निवड केवळ मुलाखतीतील गुणांवरच ठरणार असेल, तर लेखी परीक्षेचा प्रपंच कशासाठी?" असा रोखठोक प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे. मुलाखतीतील किमान गुणांच्या अटीमुळे गुणवंत उमेदवारांच्या स्वप्नांवर पाणी फेरले जात असून त्यांची संपूर्ण गुणवत्ता दुर्लक्षित केली जात असल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली आहे.

राज्यसेवेच्या धर्तीवर न्याय देण्याची मागणी

MPSC च्या राज्यसेवा परीक्षांमध्ये लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही टप्प्यांतील गुणांची एकत्रित बेरीज करूनच अंतिम गुणवत्ता यादी (Merit List) तयार केली जाते. याच धर्तीवर 'सहायक संचालक (माहिती)' आणि इतर थेट भरतीच्या परीक्षांमध्येही एकूण गुणांचा विचार व्हावा, अशी आग्रही मागणी उमेदवारांनी केली आहे. यामुळे निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल आणि ज्यांची एकूण गुणसंख्या जास्त आहे, त्यांनाच संधी मिळेल.

मुलाखतीत १ गुण कमी मिळाला म्हणून अपात्र ठरवणे हा सरळ सरळ अन्याय असून, राज्य सरकार आणि MPSC ने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन नियमात बदल करावा आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.