पुणे/मुंबई, (प्रतिनिधी) ९ जून - मराठी चित्रपटसृष्टीचे लक्ष लागून राहिलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक अखेर रविवारी (७ जून) पार पडली असून, या पंचवार्षिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत अभिनेत्री विभागातून ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि संगीत क्षेत्रातून सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तब्बल ७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ही निवडणूक संपन्न झाल्याने संपूर्ण चित्रपट वर्तुळातून सुटकेचा निश्वास सोडण्यात येत आहे.
सुशांत शेलार आणि आनंद काळे यांच्यात 'कांटे की टक्कर'!
या निवडणुकीत सर्वाधिक चुरस अभिनेता साहस दृश्य विभागात पाहायला मिळाली. या जागेसाठी अभिनेते सुशांत शेलार आणि आनंद काळे यांच्यात थेट आणि अटीतटीची लढत झाली. यामध्ये आनंद काळे यांना ६३१ मतांवर समाधान मानावे लागले, तर सुशांत शेलार यांनी तब्बल ८९१ मते मिळवत या प्रतिष्ठेच्या लढतीत दणदणीत बाजी मारली आणि विजयाचा गुलाल उधळला.
निर्माता विभागावर मेघराज राजेंचे वर्चस्व, दीपक कदमही विजयी
महामंडळाच्या इतर महत्त्वाच्या विभागांमध्येही जोरदार चुरस पाहायला मिळाली. निर्माता विभागातून मेघराज राजे भोसले यांना सर्वाधिक ९५१ मते मिळाली असून, त्यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. दिग्दर्शक विभागातून दीपक कदम यांनी ८४६ मते मिळवून प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजय संपादन केला.
तसेच, व्हीएफएक्स (VFX) विभागातून विजय खोचिकर यांची आधीच बिनविरोध निवड झाली होती, तर नृत्य विभागातून सुभाष नकाशे यांनी सर्वाधिक मते मिळवून विजय मिळवला आहे.
विजय पाटकरांना अर्ज भरता आला नाही, नीलम शिर्केंची माघार
या निवडणुकीच्या धामधुमीत अनेक नाट्यमय घडामोडीही घडल्या. ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांना तीव्र इच्छा असूनही काही तांत्रिक कारणांमुळे या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरता आला नव्हता, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये निराशा होती. दुसरीकडे, अभिनेत्री नीलम शिर्के यांनी ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शवत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. त्यामुळे वर्षा उसगावकर यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला.
महामंडळाची ही निवडणूक शांततेत आणि उत्साहात पार पडली असून, आता नवीन कार्यकारिणी मराठी चित्रपटसृष्टीच्या आणि कलाकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर कशी मात करते, याकडे संपूर्ण सिनेसृष्टीचे लक्ष लागले आहे.
महामंडळ निवडणूक: कोणाला किती मते?
बिनविरोध निवड: वर्षा उसगावकर (अभिनेत्री विभाग), आनंद शिंदे (संगीत विभाग), विजय खोचिकर (व्हीएफएक्स विभाग).
सुशांत शेलार (विजेते): ८९१ मते (अभिनेता साहस दृश्य विभाग)
आनंद काळे: ६३१ मते
मेघराज राजे भोसले (विजेते): ९५१ मते (निर्माता विभाग)
दीपक कदम (विजेते): ८४६ मते (दिग्दर्शक विभाग)
नृत्य विभाग: सुभाष नकाशे विजयी (सर्वाधिक मते).