मुंबई, (प्रतिनिधी) ९ जून - अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज मुंबई आणि अहमदाबादमधील सात वेगवेगळ्या ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकत तब्बल १३.५ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. 'बँक ऑफ महाराष्ट्र' आणि नाशिकची अग्रगण्य सहकारी बँक असलेल्या 'नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक' (नामको) मधील बँक खात्यांमधून झालेल्या संशयास्पद डेबिट व्यवहारांच्या तपासादरम्यान हा सर्व प्रकार समोर आला आहे. या बँकांमधील खात्यांमधून शेकडो कोटी रुपये विविध बनावट कंपन्यांमध्ये वळवण्यात आल्याचे 'ईडी'च्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
डमी कंपन्या आणि हवाला ऑपरेटरचे नेटवर्क
'ईडी'ने दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. संशयितांनी विविध डमी कंपन्यांच्या (Dummy Entities) नावावर बँक खाती उघडून त्यातून मोठ्या प्रमाणावर निधी गोळा केला. त्यानंतर ही मोठी रक्कम खात्यांमधून काढून घेऊन मुंबई, अहमदाबाद आणि सुरत येथील हवाला ऑपरेटरमार्फत इतरत्र वळवण्यात आली. या आंतरराज्यीय रॅकेटमध्ये अनेक मोठे आर्थिक दलाल आणि बँक अधिकारी संशयाच्या भोऱ्यात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मालेगाव 'नामको' बँकेच्या छाप्यांशी कनेक्शन!
विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाची मुळे नाशिक जिल्ह्याशी जोडलेली आहेत. याच आर्थिक गैरव्यवहार आणि संशयास्पद खात्यांच्या तपासाच्या अनुषंगाने 'ईडी'ने गत नोव्हेंबर महिन्यात नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (नामको) मालेगाव शाखेवर मोठे छापे टाकले होते. मालेगाव येथील कारवाईदरम्यान हाती लागलेल्या महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि डिजिटल पुराव्यांचा माग काढत 'ईडी'ने आज मुंबई आणि गुजरातमध्ये ही मोठी कारवाई केली आहे.
आज दिवसभर सुरू असलेल्या या छापेसत्रामुळे महाराष्ट्रासह गुजरातच्या आर्थिक आणि बँकिंग वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची छाननी सुरू असून, येत्या काही दिवसांत नाशिक आणि मुंबईतील काही बड्या असामींची चौकशी होण्याची दाट शक्यता 'ईडी'च्या सूत्रांनी वर्तवली आहे.