शाळांच्या वेळापत्रकात यासाठी स्वतंत्र २ तास? शिक्षण आयुक्तांचे मोठे संकेत... मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण...

Share:
Main Image
Last updated: 10-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १० जून - शालेय शिक्षणात केवळ अभ्यासक्रम महत्त्वाचा नसून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, संवादकौशल्य आणि चांगल्या नागरिकत्वाचे गुण विकसित करण्यासाठी मूल्य शिक्षणाला विशेष महत्त्व आहे. देशाचे सजग आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी मूल्य आधारित शिक्षण ही काळाची गरज असून, या पार्श्वभूमीवर राज्यात मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची (२.०) अंमलबजावणी व्यापक स्तरावर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या परिणाम साध्यतेच्या मूल्यमापनाचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) तर राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.

शिक्षकांचे प्रशिक्षण अन् विद्यार्थ्यांमधील सकारात्मक बदल

बैठकीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात शिक्षकांची अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची क्षमता आणि त्यांच्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना दिले जाणारे प्रशिक्षण विद्यार्थ्यांमधील भीती, संकोच आणि शंका दूर करण्यास मदत करत असून ज्ञानार्जनाची प्रक्रिया अधिक प्रभावी बनवत आहे. विद्यार्थ्यांना केवळ गुणवंत नव्हे तर संवेदनशील नागरिक बनविण्यासाठी ही चळवळ व्यापक करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

शाळांच्या वेळापत्रकात स्वतंत्र दोन तास?

मूल्यवर्धन उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेता, शाळांच्या नियमित वेळापत्रकात मूल्याधारित शिक्षणासाठी स्वतंत्र दोन तास असण्याची विचारधारा असल्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी बैठकीत सांगितले. या उपक्रमामुळे शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीत गुणात्मक बदल होत असल्याचा निर्वाळा एससीईआरटीचे संचालक हेमंत वसेकर यांनी दिला.

ग्रामीण भागातील शाळांमध्ये सकारात्मक क्रांती

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे शाळांमध्ये विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग वाढून लक्षणीय बदल घडत आहेत. शिक्षकांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन विकसित होत असून याची दखल देशपातळीवर घेतली जात आहे. तर सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था यांनी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या उत्कृष्ट कामाचे कौतुक केले.

Advertisement

शिक्षकांनी मांडले प्रत्यक्ष अनुभव:

या बैठकीत पुणे, यवतमाळ, नांदेड, पालघर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील शिक्षकांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होऊन आपले अनुभव कथन केले. मूल्यवर्धन उपक्रमामुळे शाळांमध्ये झालेले सकारात्मक बदल शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले:

विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली.

वर्गातील उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग सुधारला.

शालेय वातावरण अधिक आनंददायी आणि सकारात्मक बनले.

या स्तुत्य उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व शिक्षक, सहभागी संस्था आणि संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. या बैठकीला मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, शिक्षण सचिव रणजितसिंह देओल यांच्यासह एसबीआय बँक, बंधन बँक फाउंडेशन, फिरोदिया फाउंडेशन आणि शांतीलाल मुथ्था फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.