'पोर्शे' ते 'ड्रग्ज' प्रकरणातील तपासाचे वाभाडे... तपास अधिकाऱ्यांना 'पद्म' पुरस्कारांसाठी शिफारस पत्र...

Share:
Main Image
Last updated: 09-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ९ जून - राज्यातील कायदा-सुव्यवस्था, बहुचर्चित गुन्हेगारी प्रकरणे आणि त्यातील संशयित आरोपींना मिळणाऱ्या जामिनावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या फायरब्रँड प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारवर अत्यंत बोचरी आणि उपरोधिक टीका केली आहे. "दोन-तीन महिने अधिकाऱ्यांना सुप्रीमो झाल्याचा आणि सत्ताधाऱ्यांच्या पपेट्सना (बाहुल्यांना) लुटुपुटू लढण्याचा आनंद मिळाला. आता मुख्य प्रश्नांकडून सगळ्यांचे लक्ष वळवून 'हॅप्पी एंडिंग' सुरू आहे," असा टोला लगावत त्यांनी तपास यंत्रणांच्या कामगिरीवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकरणांचा पाढा वाचत थेट मुख्यमंत्री आणि गृहविभागाला लक्ष्य केले.

"बड्या बापाच्या औलादीचे जंगी सेलिब्रेशन!"

पुण्यातील बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल याला मिळालेल्या जामिनाचा उल्लेख करत अंधारे यांनी संताप व्यक्त केला. "पोर्शे कार अपघात प्रकरणातील 'बडे बाप की औलाद' विशाल अग्रवालला जामीन झाला आणि त्याचे जंगी सेलिब्रेशनही झाले," असे म्हणत त्यांनी श्रीमंत आरोपींना मिळणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंटवर बोट ठेवले. तसेच, मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीलाही जामीन मिळाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ड्रग्ज प्रकरणाच्या तपासावर सत्ताधारी-विरोधक दोघेही गप्प!

राज्यातील ड्रग्जच्या विळख्यावर बोलताना त्यांनी तपास यंत्रणांसह विरोधकांनाही धारेवर धरले. त्या म्हण्याल्या:

"मुलुंड ते पुणे व्हाया सावरी सातारा ड्रग्ज प्रकरणातील पाळेमुळे खणून काढू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले असले, तरी तपास अधिकारी संदीप डोईफोडे यांच्याकडून हा तपास नेमका कुठपर्यंत आला, हे सत्ताधारी सांगत नाहीत आणि आश्चर्य म्हणजे विरोधकही याबाबत सभागृहात प्रश्न विचारत नाहीत."

Advertisement

"खरात आणि चाकणकरांचे 'दहा बोटे तुपात'..."

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि खरात यांच्याशी संबंधित प्रकरणातील एसआयटी (SIT) आता बरखास्त झाल्याचा दावा अंधारे यांनी केला आहे. "आता खरात प्रकरणातील एसआयटी बरखास्त झाली आहे म्हणे. लवकरच खरात आणि चाकणकर यांना सुद्धा ईडी, एसआयटी, पोलीस सगळीकडून सन्मानाने वाजत-गाजत क्लीन चीट मिळायला पाहिजे," असा खोचक टोला त्यांनी लगावला.

"या लोकांचे 'दस उंगलियां घी में और सर कढाई में' अशी अवस्था आहे. सरकारला दोन-तीन महिने मुख्य प्रश्नांकडून जनतेचे लक्ष आंबट शौकीन व्हिडिओजकडे वळवण्याचा आनंद मिळाला," अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

...तर तपास अधिकाऱ्यांना 'पद्मश्री' द्या!

आपल्या टीकेच्या शेवटी त्यांनी अत्यंत उपरोधिक शैलीत प्रशासनाला आदेश दे थाटात म्हटले की, "एsss कोण आहे रे तिकडे... सगळ्या प्रकरणातल्या तपास अधिकाऱ्यांना पद्मश्री, पद्मविभूषणसाठीची शिफारस पत्रं तयार ठेवा!"

सुषमा अंधारे यांच्या या विधानामुळे राज्यातील गुन्हेगारी प्रकरणांचे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता असून, यावर आता सत्ताधाऱ्यांकडून काय प्रत्युत्तर येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.