अरे हे चाललंय काय... नंदिनी नदीपात्रातचा सांडपाणी वाहिनी... मनपाचा कारभार वादाच्या भोवऱ्यात...

Share:
Main Image
Last updated: 08-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ८ जून - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीची कामे आणि अमृत योजना नाशिकमध्ये वादाच्या भोऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. गोदावरीची अत्यंत महत्त्वाची उपनदी असलेल्या नंदिनी नदीच्या पात्रातून अमृत योजनेअंतर्गत प्रस्तावित सांडपाणी पाईपलाईन टाकण्याच्या कामाला पर्यावरणप्रेमी, निसर्गसेवक आणि स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध सुरू झाला आहे. हे काम तातडीने स्थगित करून संपूर्ण प्रकरणाचा फेरविचार करावा, अशी मागणी 'निसर्गसेवक युवा मंचा'चे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी केली आहे. यासंदर्भात अमित कुलकर्णी यांनी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तसेच मा. उच्च न्यायालय आदेशित गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त यांना सविस्तर निवेदन सादर करून प्रशासकीय भूमिकेवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

नदी पुनरुज्जीवनाच्या उद्दिष्टांशी थेट विसंगती!

नंदिनी नदीचे प्रदूषणमुक्ती, पुनरुज्जीवन आणि पर्यावरणीय संवर्धनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक आणि स्वयंसेवी संस्था विविध स्तरांवर प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत नदीच्या पात्रातूनच थेट सांडपाणी वाहिनी नेण्याचा निर्णय अत्यंत अनाकलनीय आणि गंभीर आहे. यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह, तेथील जैवविविधता आणि भविष्यातील संपूर्ण पुनरुज्जीवन प्रक्रियेवर अत्यंत विपरीत व घातक परिणाम होऊ शकतो, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

उच्च न्यायालय गठीत समितीने तातडीने दखल घ्यावी

नंदिनी ही गोदावरीची मुख्य उपनदी असल्याने या प्रकरणात मा. उच्च न्यायालय आदेशित गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची भूमिका सर्वोच्च ठरते. गोदावरी व तिच्या उपनद्यांमधील प्रदूषण नियंत्रण, नदी संवर्धन आणि न्यायालयीन आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची अंतिम जबाबदारी असलेल्या समितीने या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे. समितीच्या अध्यक्षांनी स्वतः या संवेदनशील विषयाची दखल घेऊन तातडीने स्थळ पाहणी करावी आणि संबंधित यंत्रणेला आवश्यक ते निर्देश द्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे.

मनपाने तांत्रिक अहवाल सार्वजनिक करावा!

Advertisement

निसर्गसेवक युवा मंचाने नाशिक महानगरपालिका प्रशासनालाही धारेवर धरले आहे. मनपा आयुक्तांनी या कामासंदर्भातील सर्व तांत्रिक अहवाल, पर्यावरणीय अभ्यास (Environmental Impact Assessment), मिळालेली मंजुरी प्रक्रिया आणि या प्रकल्पासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायी मार्गांचा विचार जाहीर करावा, जेणेकरून पारदर्शकता समोर येईल, अशी रोखठोक मागणी नागरिकांनी केली आहे.

रोखठोक प्रतिक्रिया:

"आम्ही शहराच्या सांडपाणी व्यवस्थापनाला किंवा विकासाला विरोध करत नाही; मात्र सांडपाणी वाहून नेण्यासाठी थेट नदीपात्राचाच वापर करून नदीच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या प्रशासकीय निर्णयाला आमचा तीव्र विरोध आहे. नंदिनी नदी ही केवळ जलवाहिनी नसून नाशिकच्या पर्यावरणीय भविष्याचा महत्त्वाचा घटक आहे. नदी वाचली तरच भविष्यातील पिढ्यांना स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण मिळेल. महापालिका आयुक्तांनी हे काम तात्काळ स्थगित करावे."

— अमित कुलकर्णी (अध्यक्ष, निसर्गसेवक युवा मंच)

प्रशासन मौन; जनआंदोलनाचा इशारा

दरम्यान, या संवेदनशील विषयावर नाशिक महानगरपालिका किंवा जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या मौनामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संताप असून, या प्रकरणाचा तातडीने आणि पारदर्शक खुलासा करण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने तात्काळ पावले उचलून काम न थांबवल्यास लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही निसर्गसेवक युवा मंच आणि स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.