मोबाईल विकण्याच्या नादात आला... चोरटा असा पोलिसांच्या हाती लागला... या गुन्ह्यांची दिली कबुली...

Share:
Main Image
Last updated: 08-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ८ जून - पंचवटीतील तपोवन आणि स्वामीनारायण मंदिर परिसरात देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या कारच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला आडगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तपोवन भागात गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ घालणारा हा चोरटा चोरीचे मोबाईल विकण्याच्या नादात पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपन्यांचे सुमारे १ लाख ५ हजार रुपये किमतीचे ८ महागडे मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्याच्या अटकेने वाहन फोडीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे. कार्तिक अशोक नाडार असे अटक करण्यात आलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे.

अशी झाली कारवाई...

गेल्या ११ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास चोरट्यांनी स्वामीनारायण मंदिर परिसरात उभी असलेली 'आय-२०' कार (क्रमांक MH 15 CM 4347) ची काच फोडून आतील मोबाईल आणि रोकड असलेली पर्स चोरून नेली होती. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक या चोरट्यांचा माग काढत होते.

दरम्यान, गुन्हे शोध पथकाचे अंमलदार दीपक भुजबळ यांना एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. पाठीवर सॅक अडकवलेला एक तरुण तपोवन भागात चोरीचे मोबाईल विकण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी (दि. ६) सायंकाळी स्वामीनारायण मंदिराकडून अमरधामकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी दबा धरून सापळा रचला आणि संशयित कार्तिक नाडार याच्या तरातरा मुसक्या आवळल्या.

Advertisement

अंगझडतीत सापडले महागडे मोबाईल; साथीदारांचा शोध सुरू

पोलिसांनी संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ लाख ५ हजार रुपये किमतीचे ८ मोबाईल मिळून आले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने स्वामीनारायण मंदिर परिसरातील कार फोडल्याची कबुली दिली, तसेच अशाच पद्धतीने अनेक वाहने फोडल्याचेही त्याने कबूल केले. या गुन्ह्यात त्याला आणखी कोणाची साथ लाभली आहे का? किंवा त्याचे काही साथीदार आहेत का? या दृष्टीने आडगाव पोलीस आता पुढील तपास करीत आहेत.

या पथकाने केली कामगिरी:

ही धडक कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे व शिवाजी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निखिल बोंडे, उपनिरीक्षक विकास पंचमुख, हवालदार मनोज परदेशी, दादासाहेब वाघ, इम्रान शेख, संजय राजुळे, निलेश काटकर, शिवाजी आव्हाड, अंमलदार अक्षय गोसावी, सुरेश खालकर, दीपक भुजबळ, प्रीतम बोराटे, कुणाल राऊत, रवींद्र लिळके, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे व वैशाली बच्छाव आदींच्या पथकाने केली.

Advertisement

Comments

No comments yet.