मुंबई, (प्रतिनिधी) ७ जून - राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम (MSME) उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि तज्ज्ञांचा सल्ला मिळवण्यासाठी आता कुठेही भटकण्याची गरज नाही. महाराष्ट्र RAMP कार्यक्रमांतर्गत राज्यभरातील उद्योजकांसाठी एक विशेष 'MSME हेल्पलाईन' सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनद्वारे उद्योजकांना पूर्णतः मोफत मार्गदर्शन आणि सल्ला उपलब्ध करून दिला जाणार आहे. केंद्र सरकारचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MoMSME) आणि जागतिक बँक यांच्या सहकार्याने हा उपक्रम महाराष्ट्रात 'महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ' (MSSIDC) मार्फत कार्यान्वित करण्यात आला आहे. तर 'मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर' (MCCIA) यांच्या माध्यमातून ही हेल्पलाईन सेवा प्रत्यक्षात चालवली जाणार आहे.
उद्योजकांनो, हा नंबर सेव्ह करा!
राज्यातील कोणत्याही भागातील नवउद्योजक, व्यावसायिक किंवा कारागीर खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात:
हेल्पलाईन क्रमांक: +91 8308809334 (या क्रमांकावर कॉल किंवा WhatsApp संदेश पाठवून मदत मिळवता येईल.)
एकाच छताखाली मिळणार 'या' सर्व सेवा:
शासनाच्या अनेक योजना असूनही वेळेवर योग्य माहिती न मिळाल्याने अनेक उद्योग मागे पडतात. हीच अडचण दूर करण्यासाठी या हेल्पलाईनच्या माध्यमातून खालील विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल:
नोंदणी व कर सल्ला: नवीन उद्योग सुरू करणे, उद्यम नोंदणी (Udyam Registration), GST नोंदणी आणि करविषयक कायदेशीर सल्ला.
आर्थिक नियोजन व कर्ज: व्यवसायासाठी वित्तीय नियोजन, बँक कर्ज, पतपुरवठा आणि विविध शासकीय अनुदान योजनांची माहिती.
मार्केटिंग व सरकारी खरेदी: 'GeM' पोर्टलवरील नोंदणी, उत्पादनांचे ब्रँडिंग, मार्केटिंग आणि आयात-निर्यात (Export) व्यवसाय सुरू करण्याचे तंत्र.
आधुनिक तंत्रज्ञान: व्यवसाय वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन.
प्रकल्प अहवाल: बँकेकडून कर्ज घेण्यासाठी आवश्यक असणारा 'प्रकल्प अहवाल' (Project Report) तयार करण्यास मदत.
महिला आणि ग्रामीण नवउद्योजकांना प्राधान्य
या उपक्रमाचा सर्वाधिक फायदा नवीन स्टार्टअप्स, महिला उद्योजिका, ग्रामीण भागातील लघुउद्योग, स्थानिक कारागीर आणि स्वयंरोजगार गटांना होणार आहे. ज्या उद्योजकांना आपल्या सध्याच्या व्यवसायाचा विस्तार (Expansion) करायचा आहे, त्यांनाही यातून योग्य दिशा मिळेल.
महामंडळाचे आवाहन:
"महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात आणि रोजगारनिर्मितीमध्ये MSME क्षेत्राचा वाटा मोठा आहे. उद्योगांची स्पर्धात्मकता वाढवणे आणि त्यांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे हेच 'RAMP' चे उद्दिष्ट आहे. राज्यातील सर्व नवउद्योजक, महिला आणि कारागिरांनी या मोफत सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा."
— व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC)