लातूर, (प्रतिनिधी) ७ जून - लातूर जिल्ह्यातील खंडापूर येथे पार पडलेल्या भव्य अखंड हरिनाम सप्ताह उत्सवात जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणगीत तब्बल ३ कोटी ६५ लाख रुपयांचा कथित अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुख्य आयोजक किशोर धोंडीराम जाधव (शिवणीकर) यांच्यासह अन्य संबंधित व्यक्तींविरुद्ध लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'भ्रष्टाचार विरोधी वारकरी संप्रदाय कृती समिती'ने या प्रकरणाचा सातत्याने लावून धरलेल्या पाठपुराव्याला आणि आंदोलनाला या कारवाईमुळे मोठे यश आले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
फेब्रुवारी-मार्च २०२६ दरम्यान खंडापूर येथे 'वारकऱ्यांचा कुंभ' म्हणून ओळखल्या गेलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक आणि वारकरी संप्रदायातून सढळ हाताने कोट्यवधी रुपयांची देणगी देण्यात आली होती. या उत्सवातून जमा होणाऱ्या निधीचा काही भाग देहू येथील भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभारण्यासाठी वापरला जाईल, असे आश्वासन आयोजकांकडून देण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
५.९८ कोटी जमा, ३.६५ कोटींचा हिशेब मिळेना!
श्याम भारत बरुरे (रा. हरगुळ बु., ता. जि. लातूर) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, या धार्मिक उत्सवासाठी एकूण ५ कोटी ९८ लाख ९५ हजार २४२ रुपयांचा निधी देणगीच्या स्वरूपात जमा झाला होता. त्यापैकी २ कोटी ३३ लाख ८ हजार १६६ रुपये सप्ताहाच्या विविध खर्चासाठी वापरण्यात आले. मात्र, उर्वरित तब्बल ३ कोटी ६५ लाख ८७ हजार ७६ रुपयांचा कोणताही अधिकृत हिशेब किंवा लेखाजोखा आयोजकांकडून सादर करण्यात आला नाही. या रकमेचा संगनमताने अपहार केल्याचा थेट आरोप तक्रारदाराने केला आहे.
नोंदणीकृत ट्रस्ट नसताना संकलन
तक्रारीत धक्कादायक बाब समोर आली आहे की, उत्सवासाठी अधिकृत ट्रस्ट स्थापन करण्याची केवळ घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात कोणताही नोंदणीकृत ट्रस्ट अस्तित्वात नसतानाही अंदाजे ३,५०० पावती पुस्तके छापून बेकायदेशीरपणे देणगी गोळा करण्यात आली.
हिशेब मागताच बंदुकीचे स्टेटस ठेवून धमकी!
फिर्यादी श्याम बरुरे यांनी विविध गावांमधील ६ लाख ४३ हजार ९५४ रुपयांच्या एकूण २९ मूळ पावत्या आणि स्वतः दिलेल्या ११ हजार रुपयांच्या देणगीची पावती पुराव्यादाखल पोलिसांकडे सुपूर्द केली आहे. विशेष म्हणजे, भाविक आणि सेवेकऱ्यांनी जेव्हा जमा झालेल्या निधीचा हिशेब मागितला, तेव्हा संबंधित संशयितांकडून सोशल मीडियावर बंदुकीचे छायाचित्र असलेले स्टेटस ठेवून अप्रत्यक्षपणे धमकावण्यात आले. यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
कृती समितीच्या आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई
मुख्य संशयित किशोर जाधव यांच्या अटकेसाठी 'भ्रष्टाचार विरोधी वारकरी संप्रदाय कृती समिती'ने २८ व २९ मे रोजी लातूर येथील गांधी चौकात दोन दिवसांचे तीव्र उपोषण केले होते. यामध्ये शाम बरुरे, हभप रामकृष्ण शिंदे महाराज, चंद्रकांत आरडले, महेश चामे यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.
या आंदोलनाची दखल घेत लातूर ग्रामीण पोलिसांनी प्रथम खबर क्रमांक ०३१२ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३(५), ३१६(२), ३१८(४) आणि ३५१(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून तक्रार, पावत्या आणि इतर आर्थिक दस्तऐवजांची तपासणी केली जात असून पुढील तपास सुरू आहे.