MPSC च्या हुशार पण हुकलेल्या उमेदवारांना सुवर्णसंधी... खासगी क्षेत्रात नोकरी मिळणार...

Share:
Main Image
Last updated: 06-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ६ जून - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध स्पर्धा परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूनही केवळ काही गुणांनी अंतिम निवड यादीत स्थान मिळवू न शकलेल्या गुणवंत उमेदवारांसाठी राज्य शासनाने एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अशा उमेदवारांना खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभागामार्फत ‘मैत्री २.०‘ पोर्टल अंतर्गत ‘निपुण सेतू‘ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) ‘प्रतिभा सेतू‘ या उपक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्रात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. स्पर्धा परीक्षांच्या मुलाखतीपर्यंत मजल मारलेल्या उमेदवारांकडे उच्च शैक्षणिक पात्रता, विश्लेषण क्षमता आणि प्रशासकीय कौशल्ये असतात. मर्यादित जागांमुळे त्यांची निवड होऊ शकली नसली, तरी या दर्जेदार मनुष्यबळाचा उपयोग राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने आज, ५ जून २०२६ रोजी निर्गमित केला आहे.

कोणाला मिळणार 'निपुण सेतू'चा लाभ?

पात्रता: MPSC च्या कोणत्याही परीक्षेतील मुलाखत (Interview), कौशल्य चाचणी (Skill Test) किंवा शारीरिक चाचणी (Physical Test) यासारख्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या, मात्र अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांना याचा लाभ मिळेल.

मागील वर्षातील उमेदवार: हा उपक्रम आगामी सर्व परीक्षांसाठी लागू राहीलच; परंतु मागील एका वर्षातील पात्र उमेदवारांची माहितीही त्यांच्या संमतीनंतर पोर्टलवर समाविष्ट केली जाणार आहे.

कशी असेल 'पोर्टल'ची कार्यप्रणाली आणि सुरक्षा?

१. माहितीचे स्वयंचलित हस्तांतरण: उमेदवारांची माहिती MPSC च्या अंतिम निकालानंतर सुरक्षित 'एपीआय' (API) प्रणालीद्वारे स्वयंचलितपणे पोर्टलवर पाठवली जाईल. यासाठी उमेदवारांची डिजिटल संमती अनिवार्य असेल.

Advertisement

२. पोर्टलवरील तपशील: 'निपुण सेतू' पोर्टलवर उमेदवारांचे नाव, जन्मवर्ष, शैक्षणिक पात्रता, विशेष प्राविण्य, पूर्वानुभव, संबंधित परीक्षेचे नाव आणि अंतिम टप्प्यातील गुण उपलब्ध असतील.

३. गोपनीयता आणि सुरक्षा: उमेदवारांचा संपर्क तपशील (Contact Details) केवळ अधिकृत आणि पडताळणी झालेल्या कंपन्यांनाच (नियोक्त्यांना) पाहता येईल. माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी एन्क्रिप्शन आणि ॲक्सेस कंट्रोलचा वापर केला जाईल.

४. माहिती हटविणे: जर संबंधित उमेदवाराची आयोगाच्या अन्य कोणत्याही शासकीय परीक्षेत निवड झाली, तर त्याची माहिती पोर्टलवरून आपोआप हटविली जाईल.

नोकरीची हमी नाही, केवळ समन्वयकाची भूमिका!

शासनाने स्पष्ट केले आहे की, ‘मैत्री’ पोर्टल केवळ समन्वयक (Facilitator) म्हणून काम करेल. यातून रोजगाराची कोणतीही कायदेशीर हमी दिली जाणार नाही. नोकरीचे स्वरूप, वेतन आणि सेवाशर्ती या संबंधित कंपनी आणि उमेदवार यांच्यातील परस्पर करारावर आधारित असतील.

पुढील दोन महिन्यांत पोर्टल होणार सुरू; राज्यस्तरीय समिती सज्ज

‘निपुण सेतू’ पोर्टल पुढील दोन महिन्यांत पूर्णपणे कार्यान्वित करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव किंवा प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. विकास आयुक्त (उद्योग) हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. ही समिती दर तीन महिन्यांनी आढावा घेऊन पोर्टलच्या प्रभावी वापरासाठी शासकीय व खासगी संस्थांना प्रोत्साहन देईल.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.