मुंबई, (प्रतिनिधी) ९ जून - तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. तृतीयपंथीयांच्या स्वयंरोजगार व व्यवसायासाठी 'बीज भांडवल योजना' राबविण्यास मंजुरी देण्यात आली असून, या योजनेद्वारे २५ हजार रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. तृतीयपंथीयांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे, आर्थिक स्वावलंबन प्राप्त करून देणे, कौशल्य विकासाला चालना देणे तसेच त्यांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
कर्जाचे स्वरूप आणि निधीची रचना
या योजनेअंतर्गत तीन टप्प्यांत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून त्याची रचना खालीलप्रमाणे आहे:
१. लघु कर्ज योजना: ₹२५,००० पर्यंत आर्थिक साहाय्य.
२. मध्यम कर्ज योजना: ₹५०,००० पर्यंत आर्थिक साहाय्य.
३. दीर्घ कर्ज योजना: ₹२,००,००० पर्यंत आर्थिक साहाय्य.
निधीचे वर्गीकरण (गुंतवणूक पॅटर्न):
प्रत्येक योजनेमध्ये लाभार्थ्याचा स्वतःचा हिस्सा ५ टक्के, शासनाचे अनुदान ४५ टक्के आणि बँकेचे कर्ज ५० टक्के या प्रमाणात निधीची रचना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना ३ टक्के व्याज सवलतीचा मोठा लाभ मिळणार आहे.
'या' विविध व्यवसायांसाठी मिळणार कर्ज
या योजनेद्वारे भाजी स्टॉल, चहा व स्नॅक्स सेंटर, झेरॉक्स व लेमिनेशन सेंटर, फूड स्टॉल, पिठाची गिरणी, कापडी पिशव्या निर्मिती, स्टेशनरी दुकान, मिनी मालवाहतूक टेम्पो, जनरल स्टोअर्स, आईस्क्रीम फॅक्टरी, ज्यूस सेंटर, बेकरी, ब्युटी पार्लर, सलून, मोबाईल शॉपी, मसाले निर्मिती, लॉन्ड्री व्यवसाय तसेच प्लंबर, इलेक्ट्रिशियन, एसी व घरगुती उपकरणे दुरुस्ती यासारख्या अनेकविध व्यवसायांसाठी कर्ज दिले जाईल.
पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
पात्रता: अर्जदार महाराष्ट्राचा किमान १० वर्षांचा रहिवासी असावा. वय १८ ते ५० वर्षांच्या दरम्यान असावे. यापूर्वी कोणत्याही बीज भांडवल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
कागदपत्रे: सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेले तृतीयपंथीय ओळखपत्र, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल), ओळख व पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि व्यवसायाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
येथे साधा संपर्क:
ही योजना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, मुंबई शहर कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे. अधिक माहिती आणि अर्ज प्रक्रियेसाठी तालुका समन्वयक व्यंकटी तोगरे यांच्याशी खालील पत्त्यावर किंवा मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
पत्ता: सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, मुंबई शहर, प्रशासकीय इमारत भाग-१, चौथा मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई-४०००७१.
मोबाईल क्रमांक: ८२९१७८८७५७