मुंबई, (प्रतिनिधी) ६ जून - "राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा" (NEET) देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे पारदर्शक आणि तणावरहित वातावरण असावे. कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. यासाठी सर्वच यंत्रणांनी अत्यंत सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि अधिक दक्षता घ्यावी," असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'वर्षा' निवासस्थानी आगामी 'नीट' परीक्षेच्या पूर्वतयारी संदर्भात एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्त शिरीष जैन, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार आणि राष्ट्रीय परीक्षण एजन्सी (NTA) चे महासंचालक अभिषेक सिंह यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ओळख पडताळणी काटेकोर करा; सोशल मीडियावर नजर
बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना केल्या:
सीसीटीव्ही नियंत्रण: सर्व परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा चोवीस तास कार्यरत ठेवून त्याचे कडक नियंत्रण केले जाईल.
सायबर सुरक्षा: सायबर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ओळख पडताळणी: परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची तपासणी आणि ओळख पडताळणी प्रक्रिया अतिशय काटेकोरपणे राबवली जाईल.
अफवांचे खंडन: परीक्षेसंदर्भात समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) कोणतीही अफवा किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरल्यास यंत्रणांनी तातडीने त्याचा खुलासा करावा, जेणेकरून विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही.
पुणे आणि लातूर केंद्रांवर विशेष वॉच
मुख्यमंत्र्यांनी पुणे आणि लातूर येथील परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहेत. या संवेदनशील केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवला जाईल.
तसेच परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, अखंडित वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा आणि पावसाळ्याची शक्यता लक्षात घेऊन पूर्वतयारी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासन, पोलीस आणि शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.
एनटीए (NTA) कडून सादरीकरण:
बैठकीच्या सुरुवातीला राष्ट्रीय परीक्षण एजन्सीचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सादरीकरणाद्वारे महाराष्ट्रातील एकूण परीक्षा केंद्रे, उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केलेल्या मायक्रो-प्लॅनिंगची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.