नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ६ जून - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील मानहानिकारक पराभवानंतर तृणमूल काँग्रेस (TMC) मध्ये प्रचंड हाहाकार उडाला आहे. पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी कोलकाता येथील आपल्या निवासस्थानी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत पक्षातील फूट उघड झाली. या बैठकीला पक्षाच्या ८० आमदारांपैकी केवळ ८ आमदार आणि २९ खासदारांपैकी अवघे ६ खासदार उपस्थित राहिल्याने टीएमसीच्या गोटात प्रचंड खळबळ माजली आहे. गेल्या बैठकीला २० आमदार उपस्थित होते, मात्र यावेळी हा आकडा आणखी घसरला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, टीएमसीच्या ८० पैकी ५८ आमदारांनी बंडखोरी करत स्वतंत्र गट स्थापन केला असून आपला नवा विधीमंडळ नेताही निवडला आहे. १९९८ मधील स्थापनेनंतर गेल्या २८ वर्षांच्या इतिहासात तृणमूल काँग्रेसवर आलेले हे आजवरचे सर्वात मोठे संकट मानले जात आहे.
अभिषेक बॅनर्जींच्या ‘एकछत्री’ नेतृत्वाला विरोध
काँग्रेसपासून वेगळे होत ममता बॅनर्जी यांनी तृणमूलची स्थापना केली होती. पक्षांतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संकट केवळ सत्तेतून बाहेर पडल्यामुळे आलेले नाही, तर हे थेट नेतृत्वाच्या एकछत्री कारभाराविरोधात आहे. नाराज झालेले बंडखोर आमदार आजही ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार असले, तरी ममता यांचे भाचे आणि राजकीय वारसदार मानल्या जाणाऱ्या अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वाला त्यांचा तीव्र विरोध आहे.
दिल्लीतही भडका उडणार? २३ लोकसभा खासदार बंडखोरांच्या गळाला!
‘इंडिया टुडे’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभेतील या बंडखोरीचा भडका आता संसदेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. टीएमसीच्या २९ लोकसभा खासदारांपैकी तब्बल २३ खासदार बंडखोर आमदारांच्या संपर्कात आहेत. पक्षांतर बंदी कायद्यानुसार पक्षात फूट पाडण्यासाठी दोन तृतीयांश म्हणजेच २२ खासदारांचा आकडा आवश्यक आहे, जो बंडखोरांनी ओलांडल्याचे दिसते आहे. याशिवाय राज्यसभेत पक्षाचे १३ खासदार असून, तिथेही असंतोष पसरण्याची भीती पक्षाचे वरिष्ठ राज्यसभा खासदार सुखेंदु शेखर रॉय यांनी व्यक्त केली आहे.
बैठकीला हजेरी लावणारे 'ते' निष्ठावंत नेते:
आमदार: बीना मंडल, आशिमा पात्रा, मदन मित्रा, कुणाल घोष, फिरहाद हकीम, शोभनदेब चट्टोपाध्याय, बिमान बनर्जी आणि अशोक कुमार देब.
खासदार: डोला सेन, माला रॉय, कल्याण बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी, डेरेक ओ’ब्रायन आणि सुदीप बंद्योपाध्याय.
"ममतांशिवाय त्यांचे राजकीय अस्तित्व नाही!"
पक्षाचे वरिष्ठ खासदार सुदीप बंद्योपाध्याय यांनी बंडखोरांवर टीका करताना म्हटले की, "जे लोक ममता बॅनर्जी यांची साथ सोडत आहेत, त्यांचे राजकीय अस्तित्व दीदींशिवाय काहीही नाही." दरम्यान, पक्ष नेतृत्वाने खासदारांमध्ये सध्या कोणतीही संघटित बंडखोरी नसल्याचा दावा केला आहे.
आमदारांना रोखण्यासाठी ममता बॅनर्जी मैदानात
पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी स्वतः सूत्रे हाती घेतली आहेत. त्या वैयक्तिक पातळीवर सर्व बंडखोर आमदारांशी फोनद्वारे संपर्क साधत आहेत. गेल्या दोन दिवसांत त्यांनी हावडा, मुर्शिदाबाद आणि उत्तर दिनाजपूर येथील अनेक आमदारांशी चर्चा केली आहे. यातील अनेक आमदारांनी रिटाब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडखोरांच्या बैठकीत भाग घेतला होता. आता ममता बॅनर्जी बंडखोरांचे मन वळवण्यात यशस्वी होतात की तृणमूल काँग्रेस पूर्णपणे विखुरते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.