इयत्ता २ री, ३ री, ४ थी अन् ६ वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये मोठा बदल...

Share:
Main Image
Last updated: 06-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ६ जून - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEET/NEP २०२०) च्या अनुषंगाने राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेली इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची नवी पाठ्यपुस्तके यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या हाती पडणार आहेत. या नव्या पुस्तकांमध्ये गोष्टींच्या माध्यमातून शिक्षण, भारतीय ज्ञान प्रणाली, जीवनकौशल्ये, मूल्यशिक्षण, संविधानिक मूल्ये आणि सर्वसमावेशक शिक्षणाला विशेष प्राधान्य देण्यात आल्याची माहिती विषयतज्ज्ञांनी दिली आहे. पाठ्यपुस्तकांच्या आशयाची निवड विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार आणि अध्ययन निष्पत्तीच्या (Learning Outcomes) अनुषंगाने केली आहे. प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीलाच अध्ययन निष्पत्ती आणि त्यानुसार असलेला आशय यांचा ताळमेळ स्पष्ट करणारा तक्ता देण्यात आला असून शिक्षकांना अध्यापन सुलभ व्हावे, यासाठी प्रत्येक पाठासोबत आवश्यक सूचना जोडण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर आणि मूल्यशिक्षणावर भर

'एनईपी'च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विविध विषयांमध्ये भारतीय ज्ञान प्रणालीशी संबंधित माहितीचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण, सर्जनशील लेखन, संवादकौशल्य, नेतृत्व, सहकार्य आणि जिज्ञासा यांसारख्या कौशल्यांचा विकास व्हावा, यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम पुस्तकात समाविष्ट केले आहेत. मूल्यांकन प्रक्रियेतही केवळ घोकंपट्टी न ठेवता ज्ञानात्मक, आकलनात्मक, विश्लेषणात्मक आणि उपयोजनात्मक स्वाध्यायांना स्थान दिले आहे. तसेच नागरिकांची मूलभूत कर्तव्ये, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदाऱ्यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकतेसाठी स्वतंत्र आशय दिला आहे.

सर्वसमावेशक रचना आणि 'दिव्यांग' विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व

सर्वसमावेशक शिक्षणाच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकांतील चित्रांमध्ये विविध वेशभूषा, धर्म, समाजघटक आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करण्यात आले आहे. शालेय चित्रांमध्ये आवश्यक तेथे रॅम्प (Ramp) दाखवले असून, सांकेतिक भाषेच्या (Sign Language) माध्यमातून संवाद साधणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समावेश चित्रात केला आहे. हा आशय दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुलभ आहे का, याची स्वतंत्र तज्ज्ञांकडून पडताळणी करण्यात आली आहे.

Advertisement

नव्या पाठ्यपुस्तकांची प्रमुख वैशिष्ट्ये:

डिजिटल जोड: पाठ्यपुस्तकांमध्ये क्यूआर कोडद्वारे (QR Code) ई-साहित्य उपलब्ध करून दिले जाईल.

सुरक्षा व मदत यंत्रणा: प्रत्येक पुस्तकात मानसिक आरोग्यासाठी 'टेली मानस' हेल्पलाइन, बालहक्क संरक्षणासाठी राष्ट्रीय आयोगाच्या ई-बॉक्सची माहिती आणि चाइल्ड हेल्पलाइन १०९८ ची माहिती देण्यात आली आहे.

विविधता: लिंगसमभाव, सामाजिक मूल्ये आणि जीवनकौशल्यांची प्रभावी रुजवणूक.

त्रुटी आढळल्यास सुचवा बदल; 'बालभारती'चे आवाहन

'बालभारती'च्या संचालक अनुराधा ओक यांनी सांगितले की, "या नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये शिक्षक, पालक किंवा विद्यार्थ्यांना काही त्रुटी आढळल्यास त्यांनी त्या बालभारतीकडे नक्की कळवाव्या. आलेल्या सर्व सूचनांची विषयतज्ज्ञांमार्फत छाननी केली जाईल आणि आवश्यकतेनुसार पुस्तकांच्या पुढील आवृत्त्यांमध्ये योग्य त्या सुधारणा करण्यात येतील."

Advertisement

Comments

No comments yet.