कामगारांना मोठा दिलासा... नाशिकचा हा नियम आता राज्यभरात लागू होणार...

Share:
Main Image
Last updated: 06-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ६ जून - राज्यातील माथाडी कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्या किंवा मालाची हाताळणी (चढ-उतार) करून घेण्यास प्रतिबंध करणारे स्वतंत्र परिपत्रक लवकरच जारी करण्यात येणार आहे. या नियमाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे कडक निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले आहेत. केंद्रीय श्रम मंत्रालयाने ३० ऑगस्ट १९९९ रोजी दिलेल्या निर्देशांच्या राज्यातील प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्रालयात कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

व्यापारी आणि कामगारांमध्ये एकमत

या बैठकीत बोलताना मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, "या नियमाबाबत माथाडी कामगार आणि व्यापारी संघटनांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. कामगारांच्या आरोग्यासाठी ५० किलोपेक्षा जास्त वजन न उचलण्याबाबत आता व्यापक जनजागृतीची गरज आहे. राज्यात हे परिपत्रक काढून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. तसेच इतर राज्यांमध्येही हा नियम लागू व्हावा यासाठी केंद्र सरकारशी समन्वय साधला जाईल."

Advertisement

नाशिकमध्ये अंमलबजावणी सुरू

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या १५ एप्रिल २०२६ च्या परिपत्रकाचा हवाला देत बैठकीत सांगण्यात आले की, नाशिक जिल्हा माथाडी मंडळ (लासलगाव) अंतर्गत सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, व्यापारी संघटना, ट्रान्सपोर्ट व्यवसाय, बियाणे व वखार महामंडळांना ५० किलोपेक्षा अधिक वजनाचा माल कामगारांकडून हाताळून न घेण्याच्या सूचना आधीच देण्यात आल्या आहेत. आता हा नियम संपूर्ण राज्यात कडकपणे लागू केला जाणार आहे.

या बैठकीस माजी आमदार व माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) उपस्थित होते. तसेच कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन, कामगार आयुक्त डॉ. एच.पी. तुम्मोड आणि व्यापारी व कामगार संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.