मुंबई, (प्रतिनिधी) ५ जून - मुंबईतील मनोरंजन आणि चित्रपट क्षेत्राला जागतिक पातळीवर नेण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मालाड येथील आकाशवाणीच्या (प्रसार भारती) जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’ उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासन आणि प्रसार भारती संयुक्तपणे एक 'विशेष उद्देश कंपनी' (SPV) स्थापन करणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. या संयुक्त विकासासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार आणि प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांच्यासह एमआयडीसी आणि चित्रपट महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
२७८ एकर जागेचा प्रभावी वापर
मालाड येथील प्रसार भारतीच्या एकूण २७८ एकर जागेपैकी सुमारे १५० एकर क्षेत्रावर चित्रपट नगरीसोबत संयुक्त विकास केला जाणार आहे. सध्या आकाशवाणीचे बहुतांश प्रसारण हे एफएम (FM) प्रणालीवर स्थलांतरित झाल्यामुळे ही जागा उपलब्ध झाली आहे. या जागेचा प्रभावी वापर मीडिया व मनोरंजन क्षेत्राच्या विस्तारासाठी केला जाईल. मुख्यमंत्री म्हणाले की, "सध्या या जागेवर एनडीझेड (NDZ) आणि सीआरझेड (CRZ) चे नियम लागू असल्याने काही मर्यादा आहेत. मात्र, आवश्यक वैधानिक परवानग्या, नियमांमधील बदल आणि विकास नियंत्रण नियमावलीतील सुधारणांसाठी राज्य शासन पूर्ण सहकार्य करेल."
प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि सुविधा:
या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, साऊंड स्टेजेस, हॉस्पिटॅलिटी, आयटी (IT) क्षेत्राशी संबंधित सुविधा आणि पर्यटन विकास प्रकल्प उभारले जातील. विशेष म्हणजे, येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्रे सुरू केली जाणार असून, यासाठी परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांची मदत घेतली जाईल.
जून अखेरपर्यंत आराखडा अंतिम होणार
या प्रकल्पाचा पूर्व-व्यवहार्यता अभ्यास आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी एका सल्लागार संस्थेची नियुक्ती केली जाईल. तसेच तांत्रिक बाबींना गती देण्यासाठी दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांची एक 'संयुक्त कार्यसमिती' स्थापन करण्यात आली आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत प्रकल्पातील सर्व घटक आणि विकास आराखडा अंतिम करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.