तरुण पिढी दिवसभर रिल्स बघण्यात व्यस्त... राज ठाकरे म्हणतात...

Share:
Main Image
Last updated: 05-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ५ जून - "मागच्या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि यंदा सगळ्यांनी सहन केलेला आजवरचा उच्चांकी उन्हाळा, या पार्श्वभूमीवर यंदाच्या जागतिक पर्यावरण दिवसाकडे आपण नेहमीच्या सरकारी उपचारांच्या पलीकडे जाऊन बघायला हवे. आपल्याकडे सगळ्याच बाबतीत उत्सवी उत्साह असतो. पर्यावरण दिन आला की झाडे लावून, त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्याचा अतिउत्साह दिसतो; पण त्यातली ९० टक्के झाडे संध्याकाळपर्यंतही टिकत नाहीत. काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने कोट्यवधी झाडे लावल्याची घोषणा केली, ती झाडे कुठे आहेत हे सध्या सरकारलाच माहीत," अशा तीव्र शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पर्यावरण दिनाच्या केवळ 'इव्हेंट' करण्याच्या वृत्तीवर घणाघाती टीका केली आहे. राज यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आजच्या दिवशी महाराष्ट्र शासन आणि जनतेने पर्यावरण बदलामुळे आपण काय गमावले आहे आणि भविष्यात काय गमावणार आहोत, याचा गंभीर विचार करण्याचे आवाहन केले आहे.

 "एका पावसाने शहरांची दाणादाण उडते, हा कसला विकास?"

आपल्या २०१४ मधील ‘महाराष्ट्र विकास आराखड्याचा’ (Blueprint) संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले, "मी तेंव्हाच स्पष्ट केले होते की, जर विकासाला सौंदर्य आणि पर्यावरणाच्या विचाराची जोड दिली नाही, तर तो विकास अत्यंत वरवरचा आणि पोकळ ठरतो. आज अमुक रस्ता बांधला, तमुक ब्रिज बांधला म्हणून श्रेय घेण्याची आणि त्यावर खुश होण्याची स्पर्धा सुरू आहे. पण मान्सूनचा नसलेला, अवकाळीचा केवळ एक पाऊस शहरांची दाणादाण उडवून देतो. ग्रामीण भागात पिके वाहून जातात आणि शहरी भागात गाड्या पाण्यावर तरंगतात. या उन्हाळ्यात तर परिस्थिती अशी होती की सकाळी १० नंतर शेतात काम करायला जायला मजूर आणि शेतकरी धजावत नव्हते. या भयानक वास्तवाचा अर्थ आपण कधी लावणार आहोत का?"

 अर्थव्यवस्थेला लागलेली पर्यावरणाची 'कीड': राज ठाकरेंनी मांडली आकडेवारी

केवळ मोठ्या आकड्यांचे आकर्षण असलेल्यांसाठी राज ठाकरे यांनी काही जागतिक स्तरावरील गंभीर आकडेवारी समोर ठेवली आहे:

उत्पादकतेचे नुकसान: यावर्षीच्या अति उन्हामुळे देशाच्या उत्पादकतेचे जवळपास १५९ बिलियन डॉलर्सचे अफाट नुकसान झाले आहे.

कामाचे तास घटले: अतिप्रचंड उन्हामुळे काम न करता आल्याने गेल्या काही वर्षांत वर्षाला सरासरी १६० बिलियन कामाच्या तासांचे नुकसान झाले आहे.

जीडीपीमध्ये घट: पर्यावरण बदलांमुळे देशाच्या जीडीपीत २.५ ते ४.५ टक्क्यांची घट येऊ शकते, असा थेट अंदाज 'वर्ल्ड बँके'ने वर्तवला आहे.

धोक्याच्या छायेत लोकसंख्या: एका जागतिक अभ्यासानुसार, देशातील ५७ टक्के जिल्हे (जिथे देशाची ७६% लोकसंख्या राहते) हे पर्यावरण बदलामुळे होणाऱ्या जबर हानीच्या उंबरठ्यावर उभे आहेत.

Advertisement

राज यांनी सवाल केला की, आपण जेंव्हा आपली अर्थव्यवस्था अमुक तमुक क्रमांकाची म्हणून उर बडवून घेतो, तेंव्हा या आकडेवारीचा विचार कधी करणार?

 "११ वर्षांत १६ 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याने' नष्ट!"

केंद्र सरकारच्या धोरणांवर तोफ डागताना राज ठाकरे म्हणाले की, गेल्या ११ वर्षांच्या काळात देशातील जवळपास १,७३,९८४ हेक्टर इतकी अथांग जंगल जमीन खाणी आणि रस्त्यांसाठी देऊन टाकण्यात आली. हे सगळे केवळ एकाच लाडक्या उद्योगसमूहासाठी (अदानी ग्रुप) केले गेले. देशाचे पंतप्रधान जेंव्हा 'मन की बात'मध्ये पर्यावरण बदलावर बोलतात, तेंव्हा त्यांच्या मनातील खरी गोष्ट ही जंगलांचे काहीही होवो, आम्हाला फक्त दोन-तीन उद्योगपतींनाच मोठे करायचे आहे, हीच असते.

१.७३ लाख हेक्टर म्हणजे नेमके किती, याचे गणित मांडताना त्यांनी सांगितले की, "मुंबईचे भवितव्य ज्या १०४ स्क्वेअर किलोमीटरच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यानावर' अवलंबून आहे, त्या आकाराची तब्बल १६ राष्ट्रीय उद्याने नष्ट करण्याएवढी जंगलाची जमीन गेल्या ११ वर्षांत नष्ट केली गेली."

 तरुण पिढीला आवाहन: "रिल्स सोडून निसर्गासाठी आग्रही राहा!"

आजची तरुण मुले-मुली दिवसभर सोशल मीडियावर रिल्स बघण्यात व्यस्त आहेत, कारण आपल्याकडे मान वर करून बघावे असे धड काही उरलेलेच नाही. बागा नाहीत, झाडे तोडली आहेत, डोंगर पोखरलेत आणि नद्यांचे आपणच गटार केले आहे. यामुळे येणाऱ्या एकाकीपणातून मुले रिल्स बघतात.

तरुणांना आवाहन करताना राज म्हणाले, "तुम्ही जे सोशल मीडियावर परदेशातील सुंदर शहरे आणि तिथला निसर्ग बघता, तो आपल्या देशात आणि महाराष्ट्रात आणण्यासाठी आग्रही राहा. व्यवस्थेला, सरकारला यावर जबाबदार धरा; खोटे आकडे आणि फसवी चित्रे यांना भुरळू नका. हे जर आता केले नाही, तर आपले आयुष्य किड्या-मुंग्यांसारखे होईल."

 निसर्गपूजक समाज 'निसर्गविनाशक' कधी झाला?

आपल्या संस्कृतीची आठवण करून देताना त्यांनी स्पष्ट केले की, आपण मूळचे निसर्गपूजक होतो. कोकणात आजही 'देवराया' (Sacred Groves) टिकल्या आहेत, कारण तिथल्या परंपरेने निसर्गाला जपले आहे. पर्यावरण हा पूर्वी काही मूठभर निसर्गप्रेमींचा विषय मानला जायचा, पण आज तो आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा, आरोग्याचा, शेतीचा आणि शहरांच्या अस्तित्वाचा मुख्य विषय बनला आहे. पुढील पिढीला आपण कसला महाराष्ट्र देणार? झाडांशिवायची शहरे, की नदीऐवजी गटार झालेल्या नद्या? याचा विचार आज तरी करायला हवा, तरच खऱ्या अर्थाने जागतिक पर्यावरण दिवस साजरा झाला असे म्हणता येईल, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.