मुंबई, (प्रतिनिधी) ५ जून - राज्यातील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ अंतर्गत नियमित दुसऱ्या फेरीचे सविस्तर वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना ६ जून ते ९ जून २०२६ या कालावधीत नवीन नोंदणी, अर्जातील दुरुस्ती तसेच कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आतापर्यंत ४.५ लाख प्रवेश निश्चित
राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत एकूण १२ लाख ५१ हजार २५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ४ लाख ५१ हजार ५२ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. आता उर्वरित विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या फेरीची प्रक्रिया ६ जूनपासून सुरू होत आहे.
अर्ज लॉक करणे अनिवार्य
नियमित दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना ६ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्जाचा भाग-१ दुरुस्त करता येईल. तसेच भाग-२ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येतील. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येतील. महत्त्वाचे म्हणजे, पसंतीक्रम भरल्यानंतर अर्ज लॉक करणे अनिवार्य राहणार आहे.
१३ जूनला प्रवेश वाटप यादी
१० ते १२ जूनदरम्यान प्रवेश वाटप प्रक्रिया अंतर्गत स्तरावर पार पडेल. त्यानंतर १३ जून रोजी सकाळी १० वाजता दुसऱ्या फेरीची प्रवेश वाटप यादी (Merit List) आणि कट-ऑफ यादी पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल. पात्र विद्यार्थ्यांना एसएमएस (SMS) द्वारेही याची माहिती दिली जाईल.
या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना १३ जून रोजी दुपारी १२ वाजल्यापासून १६ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन कागदपत्र पडताळणीसह आपला प्रवेश निश्चित करावा लागेल.
पुढील फेरी १८ जूनला
दुसऱ्या फेरीतील सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, १८ जून रोजी पुढील फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. तर १९ जून रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयांमधील रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालयांनी ही सर्व कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.