विधान परिषद रणधुमाळीत बंडोबा थंड... ५ जागा बिनविरोध... अर्ज माघारीनंतर १२ जागांवर 'काटे की टक्कर'...

Share:
Main Image
Last updated: 04-Jun-2026

 

मुंबई (प्रतिनिधी), ४ जून २०२६ -

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या १७ रिक्त जागांसाठी जाहीर झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या रणांगणात गुरुवारी (ता. ४) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना अनेक बंडखोरांची मनधरणी करण्यात यश आले असून, दुपारी ३ वाजेपर्यंत अनेक बड्या नेत्यांनी आपले अर्ज मागे घेतले.

या मोठ्या राजकीय घडामोडींनंतर राज्यातील १७ पैकी ५ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १२ जागांवर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (मविआ) असा थेट आणि अटीतटीचा सामना रंगणार आहे. या निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान पार पडणार असून २२ जूनला मतमोजणी होणार आहे.

या ५ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध!
अनेक बंडखोर आणि विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे पुढील ५ जागांवर अधिकृतपणे बिनविरोध निवड निश्चित झाली आहे:

१. पुणे: महायुतीचे विक्रम काकडे (मविआचे श्रीकांत पाटील व राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांची माघार).

२. ठाणे: शिवसेना महायुतीचे रवींद्र फाटक (मविआचे अभिजीत पवार यांची माघार).

३. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग: महायुतीचे अनिकेत तटकरे (ठाकरे गटाचे बाळ माने यांची माघार).

४. यवतमाळ: शिवसेना शिंदे गटाचे दुष्यंत चतुर्वेदी (काँग्रेसच्या साहेबराव कांबळे व अपक्षांची माघार).

५. वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर: भाजप महायुतीचे अरुण लखाणी (मविआचे शैलेश अग्रवाल यांची माघार).

पक्षाला यश; 'या' बड्या नेत्यांनी घेतली माघार
बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी बुधवारी रात्रीपासूनच मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे आज प्रतिष्ठेच्या लढतींमधून अनेकांनी माघार घेतली:

पुणे: भाजपचे बंडखोर प्रदीप कंद आणि सुनील टिंगरे.

नाशिक: भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार गणेश गिते.

अहिल्यानगर: काँग्रेसचे बंडखोर अपक्ष करण ससाणे आणि कमलेश गांधी.

सोलापूर: ठाकरे गटाचे धनंजय डिकोळे आणि शिंदे गटाचे नेते अपक्ष महेश साठे.

सांगली-सातारा: शिवसेनेचे बंडखोर तानाजीराव पाटील.

नांदेड: प्रवीण पाटील चिखलीकर; छत्रपती संभाजीनगर: समीर सत्तार.

Advertisement

इतर माघार: कोकणमधून अरविंद म्हात्रे, मानसी म्हात्रे, परभणीतून भाजपचे बंडखोर विश्वजीत बुधवंत, तर यवतमाळमधून सय्यद फारूक.

 

राज्यातील १२ मतदारसंघांतील 'प्रमुख लढती'चा तक्ता:

बंडखोरी शमल्यानंतर आता राज्यातील प्रमुख १२ जागांवर खालीलप्रमाणे चित्र स्पष्ट झाले आहे:

मतदारसंघ - महायुतीचे उमेदवार- महाविकास आघाडी (मविआ) / प्रमुख उमेदवार

१. नाशिक - नरेंद्र दराडे (शिवसेना) - गोकुळ गिते (अपक्ष - तगडे आव्हान)

२. सोलापूर - राजेंद्र राऊत (भाजप) - नागेश अक्कलकोटे / जीवन जानकर

३. जळगाव - नंदकिशोर महाजन (भाजप) - शरद तायडे (शिवसेना ठाकरे गट)

४. नांदेड - अमर राजूरकर (भाजप) - रामदास पाटील (काँग्रेस)

५. सांगली-सातारा - धैर्यशील कदम (भाजप) - बाळासाहेब पाटील / अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी - शदप)

६. अमरावती - प्रवीण पोटे (भाजप) - हर्षदीप देशमुख (काँग्रेस)

७. धाराशिव-लातूर-बीड - बसवराज पाटील (भाजप) - महेश देशमुख (काँग्रेस)

८. भंडारा-गोंदिया - अविनाश ब्राह्मणकर (भाजप) - दिलीप बनसोड (काँग्रेस)

९. परभणी-हिंगोली - सईद खान (शिवसेना) - डॉ. विवेक नावंदर (शिवसेना ठाकरे गट)

१०. अहिल्यानगर - प्राजक्त तनपुरे (भाजप) - (करण ससाणे यांच्या माघारीमुळे महायुती भक्कम)

११. नागपूर (पोटनिवडणूक) डॉ. राजीव पोतदार (भाजप) अतुल लोंढे (काँग्रेस)

 

आता खरी प्रतिष्ठा पणाला!
अर्ज माघारीच्या या प्रक्रियेनंतर आता खऱ्या अर्थाने राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीत मतदारांची (नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य) संख्या मर्यादित असल्याने फोडाफोडीचे राजकारण आणि रिसॉर्ट पॉलिटिक्स होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ५ जागा बिनविरोध जिंकून महायुतीने सुरुवातीलाच मोठी आघाडी घेतली असली, तरी उर्वरित १२ जागांवर मविआ महायुतीला कशी टक्कर देते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.