राज्यभर गुटखा आणि भेसळखोरांवर ७ दिवसांत मोठी कारवाई... १.५८ कोटींचा साठा जप्त, १०२ जणांना बेड्या...

Share:
Main Image
Last updated: 04-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ४ जून - राज्यात गुटखा, प्रतिबंधित पानमसाला आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आतापर्यंतची सर्वात मोठी आणि व्यापक मोहीम हाती घेतली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात २५ मे ते ३१ मे २०२६ या अवघ्या सात दिवसांच्या कालावधीत धडक कारवाई करत १ कोटी ५८ लाख २८ हजार ६७७ रुपयांचा अथांग साठा जप्त करण्यात आला आहे. या 'महामोहिमेत' एकूण २०३ आस्थापनांवर छापे टाकण्यात आले असून तब्बल १०२ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर नियम धाब्यावर बसवणाऱ्या ८६ आस्थापनांना तात्काळ सील ठोकण्यात आले आहे.

 प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्यावर सर्वाधिक प्रहार
गुटखा आणि पानमसाला बंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने राज्यभरात १३० ठिकाणी छापे टाकले. यामध्ये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत ३४ लाख ५ हजार ४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला.

विभागनिहाय झालेली कारवाई व अटक सत्र:
कोकण विभाग: सर्वात मोठी कारवाई - ४७ कारवाया, ४६ जणांना अटक.
बृहन्मुंबई: २२ कारवाया, २३ जणांना अटक.
पुणे विभाग: १४ कारवाया, १३ जणांना अटक.
छत्रपती संभाजीनगर: ८ कारवाया, ८ जणांना अटक.
नाशिक आणि अमरावती विभाग: प्रत्येकी ५ कारवाया, ५-५ जणांना अटक.
नागपूर विभाग: २ कारवाया, २ जणांना अटक.

Advertisement

 आंबे, खवा ते आईस्क्रीम; १.२४ कोटींचे भेसळयुक्त अन्न जप्त
अन्न व औषध प्रशासनाच्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या संकल्पनेअंतर्गत मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील २३ हून अधिक प्रमुख जिल्ह्यांमध्ये अस्वच्छ आणि अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्या ७३ मोठ्या आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
यामध्ये प्रामुख्याने आंबे, बुंदी लाडू, खवा, बेकरी पदार्थ, दूध व दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, तूप, आईस्क्रीम, कुल्फी आणि मसाल्यांचा समावेश होता. या सर्व ठिकाणांवरून १ कोटी २४ लाख २३ हजार ६२९ रुपये किमतीचा आणि सुमारे ९०,६३९ किलो वजनाचा संशयित निकृष्ट व असुरक्षित अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

 "बदनामीची भीती बाळगू नका, तक्रार करा!" — आयुक्त तुकाराम मुंढे
"नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. भेसळ किंवा प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन व विक्री आढळल्यास यापुढे आणखी कठोर आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल."
— तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

 नागरिकांनो, इथे नोंदवा तुमची तक्रार!
अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका असल्यास किंवा कुठेही बेकायदेशीर विक्री सुरू असल्यास नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तक्रारदाराचे नाव गुप्त राखले जाईल. यासाठी विशेष ॲपसह खालील संपर्क माध्यमे जाहीर करण्यात आली आहेत:
टोल फ्री क्रमांक:  १८००२२२३६५
ई-मेल आयडी:  jc-foodhq@gov.in
आवश्यक माहिती: तक्रार करताना अन्नपदार्थाचे नाव आणि संबंधित दुकानाचा/आस्थापनेचा अचूक पत्ता देणे अनिवार्य आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.