शाळा सुरू होताच रंगणार... ' पहिल्याच दिवशी मिळणार...  विद्यार्थिनींसाठी हे सक्तीचे...

Share:
Main Image
Last updated: 04-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ४ जून - राज्यातील जिल्हा परिषदांच्या अनेक शाळा ज्ञानदानाचे उत्कृष्ट कार्य करत आहेत. त्यांचा आदर्श घेऊन सर्वच शासकीय शाळांचा दर्जा उंचावण्यासोबतच विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. आगामी २०२६-२७ हे शैक्षणिक वर्ष सुरू होताना शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा 'प्रवेशोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा करावा आणि पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेश द्यावेत, यावर त्यांनी भर दिला.

मंत्रालयात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी राज्यातील शैक्षणिक तयारीचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीला प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांच्यासह सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि महानगरपालिका आयुक्त उपस्थित होते.

Advertisement

पहिल्याच दिवशी जोमाने स्वागत; ८०% पुस्तके पोहोचली!
मंत्री भुसे म्हणाले की, मागील वर्षाप्रमाणेच याही वर्षी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले जावे. "बालभारतीमार्फत ८० टक्के पुस्तके आधीच शाळांपर्यंत पोहोचली असून, उर्वरित पुस्तके शाळा सुरू होण्यापूर्वी पोहोचतील याची दक्षता घ्यावी," असे निर्देश त्यांनी दिले. तसेच शाळा सुरू होण्यापूर्वी परिसर स्वच्छतेचे योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

शाळांमध्ये मुलींसाठी 'पिंक रुम'ची व्यवस्था
शाळांच्या पायाभूत सुविधांवर बोलताना त्यांनी सांगितले की, केवळ इमारतीच नाही तर पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छ स्वच्छतागृहे, आकर्षक रंगरंगोटी आणि दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण व्हावीत. विशेषतः विद्यार्थिनींसाठी शाळांमध्ये *'पिंक रुम'*ची व्यवस्था करण्यात यावी. तसेच जवाहर बालभवनच्या धर्तीवर शाळांमधून कला, अभिनय, संगीत आणि वक्तृत्व या गुणांना वाव द्यावा. शाळांच्या विकासासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR) आणि माजी विद्यार्थी संघाची मदत घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

बैठकीतील इतर महत्त्वाचे निर्देश व निर्णय:
अंगणवाड्या शाळांच्या आवारात: अंगणवाड्या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या आवारात सुरू कराव्यात, ज्यामुळे भविष्यात प्राथमिक शाळांमधील विद्यार्थीसंख्या वाढण्यास मदत होईल.
मराठी भाषा अनिवार्य: सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे सक्तीचे असून, याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
'एक पेड मा के नाम' उपक्रम: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आणि राज्य शासनाच्या ३०० कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पानुसार शाळांमध्ये 'एक पेड मा के नाम' हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा.
शिक्षकांची पदे भरणार: शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी आणि शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत.
मंत्री भुसे यांनी दौंड तालुक्यातील गरदरेवाडी येथील शाळेचे कौतुकास्पद उदाहरण देत, अशा उत्कृष्ट शाळांचा आणि शिक्षकांचा इतर शाळांनी आदर्श घ्यावा असे सांगितले. तसेच पीजीआय (परफॉर्मन्स ग्रेड इंडिकेटर) मानांकनामध्ये उत्कृष्ट यश मिळवल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्याचे विशेष अभिनंदन केले.

Advertisement

Comments

No comments yet.