अन्न व औषध प्रशासनाचा जोरदार धडाका... खाद्य तेल, 'मॉन्स्टर एनर्जी' ड्रिंक, आईस्क्रीम व पामोलीन ऑईलची मोठी कारवाई...

Share:
Main Image
Last updated: 03-Jun-2026

जळगाव/अहिल्यानगर, (प्रतिनिधी) ३ जून - राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्न भेसळविरोधी विशेष मोहीम तीव्र केली असून, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यात दोन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण ४ लाख ३९ हजार ८२० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये खुल्या खाद्यतेलाची विक्री, मानकांबाह्य व विनापरवाना शीतपेये आणि संशयास्पद आईस्क्रीमचा समावेश आहे. या धडक कारवाईमुळे भेसळयुक्त आणि विनापरवाना अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

जळगाव जिल्हा: खुलं तेल आणि 'मॉन्स्टर एनर्जी' ड्रिंकवर कारवाई
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यात दोन ठिकाणी कारवाया करण्यात आल्या.
पाचोरा तालुका (वरखेडी-वाघोडे परिसर): २८ मे रोजी केलेल्या तपासणीत रिफाइन्ड सोयाबीन तेल पॅकिंग न करता खुल्या स्वरूपात विकले जात असल्याचे आढळले. अधिकाऱ्यांनी तेलाचा नमुना घेऊन ८० हजार ६४० रुपये किमतीचा ४४८ किलो साठा जप्त केला. या प्रकरणी उत्पादकाची चौकशी सुरू आहे.
चाळीसगाव: २ जून रोजी विनापरवाना शीतपेय विक्रेत्याची तपासणी करण्यात आली. येथे ‘Monster Energy’ आणि ‘Zero Energy Monster Energy Ultra’ या कार्बोनेटेड कॅफिनयुक्त शीतपेयांचे मानकांप्रमाणे नसलेले नमुने आढळले. या कारवाईत ७५ हजार रुपये किमतीचे एकूण ६०० कॅन्स (३५० मिली) जप्त करण्यात आले. संबंधित उत्पादनांचा साठा बाजारातून परत मागवण्यासाठी उत्पादक कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे.
जळगाव येथील सहायक आयुक्त (अन्न) दीनानाथ शिंदे यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर, शरद पवार आणि योगराज सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.

Advertisement

अहिल्यानगर जिल्हा: आईस्क्रीम व पामोलीन ऑईल जप्त
अहिल्यानगर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत राहुरी व नेवासा तालुक्यातून २ लाख ८४ हजार १८० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
राहुरी (शिवशक्ती आईस्क्रीम): येथील आस्थापनाची तपासणी करून 'शिवशक्ती ब्रँड'च्या आईस्क्रीम गुलकंद व अमेरिकन नट्सचे नमुने घेण्यात आले. दर्जाहीन असल्याच्या संशयावरून ४१ हजार ४४० रुपये किमतीचे १४८ पॅकेट्स आईस्क्रीम जप्त करण्यात आले.
नेवासा (संतोष किराणा स्टोअर्स): कडू गल्ली येथील या दुकानातून 'एसबीजी ब्रँड'च्या रिफाइंड पामोलीन ऑईलचा नमुना घेण्यात आला. संशयास्पद वाटल्याने २ लाख ४२ हजार ७४० रुपये किमतीचे १,४९८.४ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले.
सहायुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार, उ. र. पाटील व सहायक आयुक्त अ. अ. भोईटे यांनी ही कारवाई यशस्वी केली.

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
अन्न व औषध प्रशासनाने अन्न व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारचे खाद्यतेल खुल्या स्वरूपात न विकण्याचे सक्त आदेश दिले आहेत. तसेच ग्राहकांनी केवळ पॅकबंद खाद्यतेलाचीच खरेदी करावी, असे आवाहन केले आहे.

तक्रारीसाठी टोल-फ्री क्रमांक:
जिल्ह्यात कुठेही भेसळ किंवा अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा प्रशासनाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त अ. अ. भोईटे व जळगाव प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Comments

No comments yet.